२०२० हे वर्षच इतिहासात जाऊन पुसून टाकता आलं तर... या कल्पनेनं अनेकांच्या आयुष्यात काय बदल होतील, याची कल्पना देखील करवत नाही. कारण याच वर्षी कोरोनानं सर्वत्र धुमाकूळ घातला होता. किड्या-मुंग्यांसारखी माणसं मरत होती. यावर नियंत्रण मिळविम्यासाठी मग कोविडची लस विकसित झाली. ही लस घेतल्याशिवाय घराबाहेर पडण्यावर बंधन घातली गेली. परिणामी घराबाहेर पडल्याशिवाय चूल न पेटणाऱ्यांचा नाईलाज झाला अन् त्यांनी लस घेतल्या. अनेकांनी या लसीला विरोधही केला होता. त्याचे दुष्परिणाम भविष्यात होतील, असा अनेकांनी संशय व्यक्त केला होता. तो संशय आता दुर्देवानं खरा ठरत असल्याचं दिसतंय.
अहिल्यानगरचे पत्रकार सागर दुस्सल यांचं अकाली निधन झालंय. सागर दुस्सल यांनीही कोविशिल्ड नावाची लस घेतली होती. त्यानंतर चार वर्षांनी सागर यांना आरोग्याशी संबंधित त्रास होऊ लागला. सुरुवातीला त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा व्यवस्थित काम करत नव्हत्या, नंतर त्यांना अर्धांगवायू झाला, त्यानंतर सागर यांना खुर्चीवर बसूनच सगळी कामं करावी लागत होती. घरीच परिस्थिती बेताचीच असल्यानं सागर यांना पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी आपापल्या परीनं मदतही केली. मृत्यूच्या काही दिवस आधी सागर यांना नाशिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, सागर यांचा आजार बळावला होता, डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला अन् आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सागर यांचा जगण्याचा संघर्ष थांबला, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र त्रिमुखे यांनी दिली.
त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याविषयी सातत्यानं माहिती दिली. अनेक माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या ते सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोहोचवत होते. दुस्सल कुटुंब साधारणपणे २०२२ पासून या लसीचे दुष्परिणाम भोगत असल्याचं दुस्सल यांनीच ३० एप्रिल २०२४ रोजी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे सांगितलं होतं. त्यावेळीही दुस्सल कुटुंबियांची ना स्थानिक प्रशासन, ना स्थानिक लोकप्रतिनिधींनी दखल घेतली ना साधी विचारपूसही केली.
अखेर सागर दुस्सल यांचा या लसविरोधी मोहीमेचा दुर्देवी शेवट झालाच. सागर यांनी आयुष्यभर लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. तसंच ते कोरोनाच्या लसीविरोधातही जनजागृती करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत होते. कारण त्यांचं कुटुंब देखील या लसीच्या परिणामांचा सामना करत होतं. आता सागर यांचा हा संघर्ष थांबलाय. मात्र, मुळ मुद्दा हाच आहे की, आणखी कितीतरी दुस्सल कुटुंबासारखी लोकं या लसीविरोधातला संघर्ष करत असतील ? सरकारच्या धोरणांचा विरोध करण्याचं धाडस सागर सारखे किती लोकं करतील ? हा देखील प्रश्नच आहे.
कोरोना लसीच्या दुष्परिणामांबद्दल आवाज उठविणाऱ्या सागर दुस्सलच्या कुटुंबियाला आता तरी सरकारनं नुकसान भरपाई दिली पाहिजे. सागर दुस्सल यांना लस घेतल्यानंतर सुरु झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी ३० एप्रिल २०२४ रोजी लिहिलेली सोशल मीडिया पोस्ट खाली जशीच्या तशी देत आहोत
लस फुकट दिली फुकट दिली असा टेंबा मिळवणारे काही फुकट देत नव्हते त्याचे पण पैसे त्यांनी घेतले चंदा दो धंदा लो आता सर्व काही समोर येत आहे ब्रिटेनच्या कोर्टामध्ये कबूल केलं की या लसचे मोठे दुष्परिणाम होत असून अनेकांचे जवळचे नातेवाईक घरातले व्यक्ती हे आपल्याला कायमचे सोडून गेले एवढेच नाही तर अनेकांना या लसमुळे येणाऱ्या काळात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे मी स्वतः गेल्या दीड वर्षापासून याचा दुष्परिणाम भोकात आहे माझा संसार उध्वस्त झाला आता तरी डोळे उघडा #नाहीतर वाचा आणि थंड बसा# #कोविशिल्ड