Rural Student Transportation : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शासनाने ठोस व्यवस्था करावी - भाऊ चासकर
शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी जशा स्पष्ट मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केलेल्या आहेत, त्याच धर्तीवर परीक्षा, शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा व अन्य अनिवार्य कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांची वाहतूक कशी करावी, कोणत्या सुरक्षिततेच्या निकषांवर करावी, जबाबदारी कोणाची असेल, याबाबत तातडीने स्पष्ट व बंधनकारक मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, भाऊ चासकर यांची मागणी
Transportation of Students to School Events जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, शिष्यवृत्ती व नवोदय प्रवेश परीक्षा, आधार कार्ड अद्ययावत करणे आदी विविध कारणांसाठी केंद्र, बीट, तालुका व जिल्हा पातळीवर उपस्थित राहणे बंधनकारक केले जाते. मात्र या सर्व उपक्रमांदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शासनाकडून कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नसून, या संदर्भात स्पष्ट धोरण अथवा मार्गदर्शक सूचना उपलब्ध नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊ चासकर यांनी व्यक्त केले आहे.
ग्रामीण भागात एसटीसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अनेकदा वेळेवर किंवा पुरेशी उपलब्ध नसते. अशा परिस्थितीत केवळ विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवण्याचे आदेश दिले जातात; मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे ने-आण कशी करावी, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस दिशा दिली जात नाही. दुसरीकडे, पालक रोजीरोटीसाठी कामावर असल्याने प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांसोबत जाणे त्यांना शक्य होत नाही, ही वास्तव परिस्थिती असल्याकडे चासकर यांनी लक्ष वेधले आहे.
खोडाळा तालुक्यात (जिल्हा पालघर) नुकत्याच झालेल्या क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पिकअप वाहनातून नेत असताना वाहन उलटून झालेल्या अपघातात आठ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गंभीर आहे. ग्रामीण आदिवासी भागात विद्यार्थ्यांचे ने आण करण्यासाठी सर्रास पिक अप सारख्या वाहनांचा वापर केला जातो. मात्र अशा प्रकारचा अपघात घडल्यावरच या विषयावर चर्चा सुरू होते. त्यानंतर संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांवर निश्चित करून कारवाई केली जाते, तर प्रशासन मात्र नामानिराळे राहते. ही भूमिका मुख्याध्यापक व शिक्षकांवर अन्यायकारक असून, यामध्ये स्पष्टता आणण्यासाठी शासनाने नियमावली तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मत चासकर यांनी व्यक्त केले.
शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी जशा स्पष्ट मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केलेल्या आहेत, त्याच धर्तीवर परीक्षा, शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा व अन्य अनिवार्य कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांची वाहतूक कशी करावी, कोणत्या सुरक्षिततेच्या निकषांवर करावी, जबाबदारी कोणाची असेल, याबाबत तातडीने स्पष्ट व बंधनकारक मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी ठाम मागणी भाऊ चासकर यांनी केली आहे.
विद्यार्थी सुरक्षेबाबत अलीकडेच शासनाने अध्यादेश काढलेला असताना, विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षिततेसारखा अत्यंत महत्त्वाचा विषय अपघातानंतर चर्चेचा मुद्दा न राहता, पूर्वनियोजन व धोरणात्मक निर्णयांचा भाग व्हावा, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.