Vadar Community Problems : आरक्षण असूनही भटकंतीचं जीवन, वडार समाजाच्या व्यथा
जातीचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड असूनही शिष्यवृत्ती किंवा सवलती मिळत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक तरतुदी असूनही वडार समाज मुख्य प्रवाहात का आला नाही? मॅक्स महाराष्ट्रचा हा स्पेशल रिपोर्ट पुन:प्रकाशित करत आहोत.
Vadar Community महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जमातींपैकी एक असलेल्या वडार समाजाची स्थिती आजही दयनीय आहे. OBC Reservation ओबीसी श्रेणीत आरक्षण असूनही या समाजाला सरकारी योजनांचा, शिष्यवृत्तीचा किंवा इतर सवलतींचा फायदा मिळालेला नाही. मॅक्स महाराष्ट्र या वृत्तवाहिनीच्या विशेष रिपोर्टमध्ये नांदेड जिल्ह्यातील वडार समाजाच्या झोपड्यांमध्ये जाऊन रिपोर्टर धनंजय सोळंके यांनी समाजातील सदस्यांशी केलेली चर्चा.
वडार समाज पारंपरिकपणे खड्डे खोदणे, मातीचे काम करणे अशी मजुरी करतो. मात्र, आधुनिक यंत्रे (जेसीबी) आल्याने त्यांचा रोजगार कमी झाला आहे. समाजातील सदस्य बापुराव मारुती धोत्रे, रामाजी मोरेश्वर शिंदे, इश्वर किशोर शिंदे आणि कस्तुराबाई गिरी यांनी सांगितले की, त्यांच्याकडे स्थिर घर, दरवाजा, वीज किंवा पाणी नाही. ते वर्षानुवर्षे भटकंती करतात. तसेच अद्याप ते गावगाड्यात सामील होऊ शकलले नाहीत.
शिक्षणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुले शाळेत जात नाहीत कारण पैशाची कमतरता आणि कामाची गरज असते. बहुतेक मुले काम करतात किंवा घरात राहतात, त्यामुळे शिक्षण अपूर्ण राहते. दहावीपर्यंत शिक्षण झाले तरी त्याचा फायदा होत नाही. जातीचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड असूनही शिष्यवृत्ती किंवा सवलती मिळत नाहीत.
समाजातील एकमेव शिक्षित व्यक्ती डॉ. रप्पारवाड यांनी सांगितले की, फक्त १ टक्के लोकच शिक्षित झाले आहेत आणि डॉक्टर किंवा अभियंता बनले आहेत. उर्वरित समाज गरीब राहिला आहे. सरकारी योजनांचा फायदा ब्रोकर किंवा मध्यमस्थांना मिळतो, खरे गरजवंतांपर्यंत पोहोचत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक तरतुदी असूनही हा समाज मुख्य प्रवाहात आलेला नाही. स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही या समाजापर्यंत स्वातंत्र्य पोहोचलेले नाही, असे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम आरक्षणाची चर्चा जोरात आहे, मात्र वडार समाजासारख्या भटक्या जमातींकडे आरक्षण असूनही दुर्लक्ष होत आहे. सरकारने तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.