Nashik कुंभमेळा : इथलं एकही झाड तोडायचं नाही, मनपा प्रशासनाला निरंजन टकले यांचे खडेबोल

Update: 2025-11-25 05:36 GMT

Nashik Kumbh Mela नाशिकमध्ये २०२७ होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कारण या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात ११५० एकरांवर साधुग्राम उभारण्यासाठी १८०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसलळी आहे. यासंदर्भात आंदोलनही सुरु आहे.

दरम्यान काल २४ नोव्हेंबरला नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी साधूग्राम उभारताना सुमारे १८०० झाडे तोडण्याच्या प्रस्तावावर मनपात झालेल्या जनसुनावणीत नागरिकांनी व पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध व्यक्त केला. जर तुमच्याकडे १८ हजार झाड लावायला जागा आहे तर त्या ठिकाणी साधुग्राम उभारा, इथलं एकही झाड तोडायचं नाही. गिरीश महाजनांनी १८ हजार झाडं लावण्याची बतावणी केली होती त्यावर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले  Nirajan Takle  यांनी मनपा प्रशासनाला खडेबोल सुनावले आहे. यावेळी अनेक पर्यावरणप्रेमींनी आपलं मत मांडत विरोध व्यक्त केला आहे. यावर नाशिक महापालिकेनं झाडांची सर्वे प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

पर्यावरणाला धोका

सध्या हवामान बदलाचे स्वरुप पाहता आणखी एक मानवनिर्मित आपत्तीला आमंत्रण देण्याचं काम नाशिक महापालिका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. साधुग्रामसाठी महापालिकेच्या ५४ एकर जागेवरील १८०० झाडे तोडण्याच्या प्रस्तावावर अनेकांनी आंदोलन सुरु केलं. पर्यावरणप्रेमींनुसार या जागेवर अनेक सावलीदार आणि महत्त्वाची वृक्षप्रजाती आहेत. अनेक झाडं इतके जुने आणि मोठे आहेत की, त्यांना हेरिटेज ट्री म्हणूनही घोषित करता येऊ शकते. अशा वृक्षतोडीमुळे नाशिकच्या हवामानावर, जलसाठ्यावर आणि हवेच्या गुणवत्तेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.

महापालिकेचं स्पष्टीकरण - वृक्ष तोड नसून फक्त सर्वेक्षण

पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलेल्या आरोपांवर नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी परिपत्रक जारी केले. त्यामध्ये त्यांनी सांगितले, १८२५ झाडांवर खुणा करणे म्हणजे वृक्षतोड नव्हे; हा फक्त सर्वेक्षणाचा भाग आहे. फक्त १० वर्षांखालील व बांधकामात बाधा आणणारी झाडं तोडली जाणार आहेत. जुन्या, विशाल आणि ऐतिहासिक मूल्य असलेल्या वृक्षांना जतन केले जाईल. एखादे ७ वर्षांचे झाड तोडावे लागल्यास त्या बदल्यात ७ नवीन झाडांचे वृक्षारोपण करण्यात येईल. मनपा तपोवनमधील वृक्षसंवर्धनासाठी कटिबद्ध आहे, असेही स्पष्टीकरण महापालिकेने दिले.

Similar News