Maharashtra Winter Session Nagpur 2025 : यंदाचं अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय !
आजपासून (8 डिसेंबर 2025) हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Winter Session) सुरुवात होत आहे. मात्र यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कुठलाही उल्लेख नाही.
किती दिवस चालणार अधिवेशन?
8 डिसेंबर 2025 ते 14 डिसेंबर 2025 अशा सात दिवसांसाठी अधिवेशन असणार आहे. शनिवार आणि रविवार या दिवशीही अधिवेशन सुरू असणार आहे. सात दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनातून राज्यातील जनतेला काय मिळणार ? आज पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील. शासकीय कामकाज होईल. त्यानंतर शोकप्रस्ताव मांडला जाईल. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले जाईल. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवरती पडणार का?, पुरवणी मागण्यासंदर्भात काही नवीन घोषणा होते का? हे पाहणं महत्वाचं राहील.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारचा चहापानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणं या मुद्द्यावरुन विरोधी पक्षातील नेते विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी सरकारवर कडाडून टीका केली. विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवणं हा संविधानाचा अपमान असून, सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, अशी टीका या नेत्यांनी केली.