ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉ. आनंद करंदीकर यांचं मंगळवारी (दिनांक 18 नोव्हेंबर) निधन झालं आहे. परिवर्तन विचारांना चालना देणारे करंदीकर यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात बहुमूल्य कार्य केलं.
डॉ. आनंद करंदीकर तरुणपणी (युक्रांद युवक क्रांती दल) चळवळीमध्ये सामील झाले. IIT Mumbai येथून B. Tech व त्यानंतर IIM Calcutta मधून MBA केले. पुढे Ph.D. देखील केले. 'शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान कसे पोहोचवावे' हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय राहिलेला आहे. बेरोजगार तरुण आणि जमीन गमावलेले आदिवासी यांच्याबरोबर ते सत्याग्रहात सहभागी झाले. त्या-त्या वेळी त्यांना दोन-दोन आठवड्यांचा कारावासदेखील झाला. Marketing and Econometric Consultancy Services (METRIC ) या भारतातील सर्वांत मोठ्या आणि 29 देशांत कारभार असलेल्या व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे प्रवर्तक आणि 25 वर्षे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या काळात त्यांचे वैचारिक लेखन चालूच होते. त्यांनी सामाजिक, आर्थिक इत्यादी विषयांवर मराठीतील लोकप्रिय वर्तमानपत्रे व नियतकालिकांतून विश्लेषणात्मक लेख लिहिलेले आहेत. विचारप्रवाह आणि वैचारिक संवाद वाढवण्यासाठी त्यांनी विचारवेध या वैचारिक चळवळीची सुरुवात केली. मंगळवारी त्यांना श्वसनाचा त्रास होत असतानाही त्यांच काम सुरुच होतं.
आज दिनांक 19 नोव्हेंबर सकाळी 10.30 ते 11.30 च्या दरम्यान त्यांचे पार्थिव पुण्यातील ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक लॅब मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर देहदान करण्यात येणार आहे.