Hindi Literary Icons : सावलीत उभा राहून उजेड दाखवणारे कवी विनोद कुमार शुक्ल
...म्हणूनच विनोदकुमार शुक्ल हे केवळ साहित्यिक नाहीत; ते एक नैतिक अनुभव आहेत. शब्दांचा गाजावाजा न करता, मोठ्या घोषणांशिवाय माणसाच्या आतल्या जगाला स्पर्श करणारी जी मोजकी लेखणी होती, ती आता कायमची थांबली आहे.
Vinod Kumar Shukla ख्यात साहित्यिक, कवी व कादंबरीकार विनोद कुमार शुक्ल यांचे २३ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने हिंदी साहित्यविश्वात एक शांत, संयमी पण खोलवर परिणाम करणारा आवाज हरपला आहे. शब्दांचा गाजावाजा न करता, मोठ्या घोषणांशिवाय माणसाच्या आतल्या जगाला स्पर्श करणारी जी मोजकी लेखणी होती, ती आता कायमची थांबली आहे.
विनोद कुमार शुक्ल हे समकालीन हिंदी साहित्यातील एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या लेखनात कोणताही दिखावा नव्हता, ना मोठ्या विचारांची दडपण आणणारी भाषा. उलट, अगदी साध्या, रोजच्या जीवनातील गोष्टींमधून ते मानवी अस्तित्वाच्या गाभ्याशी जाऊन भिडत. त्यांच्या कविता, कादंबऱ्या आणि गद्य लेखनात एक विलक्षण शांतता होती जणू शब्द हळूच वाचकाच्या मनात उतरतात आणि तिथेच स्थिरावतात. त्यांची भाषा अत्यंत साधी, पण अर्थाने अतिशय गहन होती. “साधेपणाचं तत्त्वज्ञान” हेच त्यांच्या साहित्याचं केंद्र म्हणावं लागेल. सामान्य माणूस, त्याचं घर, त्याचं एकटेपण, त्याच्या छोट्या इच्छा आणि अपूर्ण स्वप्नं हे सगळं त्यांच्या लेखनात सहजपणे अवतरतं. कोणताही नाट्यमयपणा न आणता, ते जीवनातील वास्तव त्याच्या मूळ स्वरूपात मांडतात. म्हणूनच त्यांचं लेखन वाचताना वाचकाला स्वतःचं आयुष्य, स्वतःचे प्रश्न आणि स्वतःची शांत दुःखं दिसतात.
विनोद कुमार शुक्ल यांच्या कवितांमध्ये विचारांची गर्जना नाही, तर संवेदनांची कुजबुज आहे. ती कुजबुज अनेकदा अधिक प्रभावी ठरते. त्यांच्या कादंबऱ्यांमध्येही कथानकापेक्षा वातावरण, अनुभव आणि माणसांच्या मनोवस्थांना अधिक महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचं साहित्य पटकन वाचून संपवता येत नाही; ते हळूहळू उलगडत जातं, आणि वाचकाला आतून बदलून टाकतं. साहित्यिक पुरस्कार, सन्मान यांची झगमग त्यांच्या लेखनाइतकी कधीच महत्त्वाची नव्हती. ते कायमच शांतपणे, स्वतःच्या मार्गाने चालत राहिले. लोकप्रियतेच्या शर्यतीत न उतरता, त्यांनी प्रामाणिक लेखनाची वाट धरली. म्हणूनच वाचकांशी त्यांचं नातं अतिशय घट्ट होतं.
विनोद कुमार शुक्ल यांचं निधन म्हणजे केवळ एका साहित्यिकाचा मृत्यू नाही, तर संवेदनशीलतेची, सौम्यतेची आणि अंतर्मुख लेखनपरंपरेची मोठी हानी आहे. मात्र त्यांच्या शब्दांमधून, त्यांच्या शांत पण खोल जाणाऱ्या साहित्यकृतींमधून ते कायम जिवंत राहतील .
विनोद कुमार शुक्ल यांना अलीकडेच ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक लेखनाचा नसून हिंदी साहित्याच्या संवेदनशील आणि नवोन्मेषी प्रवाहाचाही आहे. शुक्ल यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये म्हणजे साधी भाषा, खोल अर्थ आणि रोजच्या गोष्टींमधील जादू. नौकर की कमीज, दीवार में एक खिड़की रहती थी यांसारख्या कादंबऱ्यांत कमीज, खिडकी यांसारख्या साध्या वस्तूंना प्रतीकात्मक आणि असामान्य अर्थ प्राप्त होतो. त्यांच्या साहित्यातील जादू ही भव्य किंवा चमत्कारी नसून मानवी भावना, स्वप्ने आणि वास्तव अधिक खोलवर पोहोचवणारी आहे.
यथार्थ’ म्हणजेच ‘सत्य’. जे कोणत्याही बनावटपणाशिवाय, कल्पनेशिवाय किंवा लागलपेटीशिवाय जसेच्या तसे समोर उभे राहते, ते यथार्थ होय. सूर्योदय किंवा सूर्यास्त हे यथार्थ आहे, कारण ते सत्य आहे आणि आपण त्याची खात्री करू शकतो. मात्र, कोणी ‘मी उडू शकतो’ असे म्हणाले, तर ते यथार्थ नसून केवळ कल्पना ठरते. अशा प्रकारे यथार्थ म्हणजे सत्याची मांडणी होय. ‘यथार्थ’ हा शब्द संस्कृतमधील ‘यथा’ आणि ‘अर्थ’ या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. ‘यथा’ म्हणजे ‘जसे’ आणि ‘अर्थ’ म्हणजे ‘सत्य’ किंवा ‘वास्तव’. त्यामुळे ‘यथार्थ’ म्हणजे ‘सत्यासारखा अर्थ’. याच्या विरुद्ध जादू म्हणजे असामान्य किंवा बुद्धीच्या पलीकडील घटना. जादूमध्ये अशा घटना घडतात ज्या निसर्गनियमांच्या चौकटीबाहेरच्या वाटतात
उदा. उडणे, अदृश्य होणे किंवा वस्तू अचानक नाहीशा होणे. साहित्यामध्ये जादूचा वापर रहस्य, आश्चर्य किंवा कथानकाला वळण देण्यासाठी केला जातो.
साहित्यातील यथार्थवाद ही एक महत्त्वाची साहित्यप्रवाह आहे. तो समाजातील वास्तव परिस्थिती कोणतीही लागलपेट न करता मांडण्याचा प्रयत्न करतो. यथार्थवाद जीवन ‘जसे आहे तसे’ दाखवतो. दैनंदिन जगणे, समाजातील चांगल्या-वाईट बाजू आणि सामान्य माणसाचे संघर्ष यांचे प्रामाणिक चित्रण या प्रवाहात आढळते. गरीबी, शोषण, अन्याय, विषमता यांसारख्या सामाजिक समस्यांचा आणि त्यांचा माणसाच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचा येथे सखोल विचार केला जातो.
याच यथार्थवादी प्रवाहातून ‘जादुई यथार्थवाद’ ही उपधारा उदयास आली. जादुई यथार्थवादात वास्तव आणि जादुई किंवा अलौकिक घटक असे मिसळले जातात की ते दोन्ही एकाच वेळी स्वाभाविक वाटतात. ही शैली ना पूर्णतः कल्पनाविलास असते, ना केवळ कोरडे वास्तव. प्रतीक, मिथक, लोकविश्वास, स्वप्ने, किस्से, भूत-प्रेत अशा घटकांच्या साहाय्याने वास्तव अधिक खोलवर उलगडले जाते. या साहित्यात पात्रांच्या रोजच्या आयुष्यात जादुई घटना घडतात, पण त्या असामान्य मानल्या जात नाहीत. २०व्या शतकात लॅटिन अमेरिकेतून ही शैली उदयास आली. गॅब्रिएल गार्सिया मार्केझचे वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड किंवा सलमान रश्दीचे मिडनाइट्स चिल्ड्रन ही त्याची जागतिक उदाहरणे आहेत.
हिंदी साहित्यात यथार्थवाद १९२०–३० च्या दशकात विकसित झाला. स्वातंत्र्यलढा, सामाजिक सुधारणा, औद्योगिक बदल आणि औपनिवेशिक शोषण यांच्या पार्श्वभूमीवर लेखकांनी सामान्य माणसाचे जीवन केंद्रस्थानी ठेवले. पुढे १९५०–६० नंतर हिंदी साहित्यात जादुई यथार्थवादाची छाप दिसू लागली. उदय प्रकाश, मनोहर श्याम जोशी, अलका सरावगी, राजेश जोशी आणि विनोद कुमार शुक्ल हे या प्रवाहातील महत्त्वाचे लेखक मानले जातात.मर्यादा असूनही, विनोद कुमार शुक्ल यांचे लेखन भारतीय साहित्याची एक महत्त्वाची उपलब्धी मानली जाते. त्यांच्या जादुई यथार्थवादात भारतीय जीवनाची साधेपणा, लोकपरंपरा आणि मानवी संवेदना यांचे सुंदर संमेलन आढळते.तो कवी होता, निघून गेला. तो माणूस नवा गरम कोट घालून निघून गेला—विचारासारखा. १९६० साली लिहिलेली ही कविता आज जवळजवळ पासष्ट वर्षांनंतरही आपल्याला अस्वस्थ करते, थांबवते आणि विचार करायला लावते. कारण तो ‘नवा गरम कोट’ कुठलाही वस्त्र नाही; तो एक विचार आहे, एक जीवनदृष्टी आहे. आणि त्या विचारासारखाच चालणारा, शांतपणे पुढे जाणारा माणूस म्हणजे विनोदकुमार शुक्ल. आपल्या काळाच्या किंचित पुढे उभे राहिलेले, पण मुळात काळाच्या आत खोलवर रुजलेले असे हे साहित्यिक व्यक्तिमत्त्व आहे.
विनोदकुमार शुक्ल यांचे लेखन पाहिले की पहिली जाणीव होते ती साधेपणाची. मात्र हे साधेपण फसवं आहे. कारण ते वरवरचं नाही, ते आतून घडलेलं आहे. त्यांची भाषा फार थेट, फार घरगुती वाटते. कुठलाही अलंकार नाही, कुठलाही आव नाही. पण हीच भाषा अंगावर चढताच आजूबाजूचं तापमान बदलतं. ती वाचकाला ऊब देते बौद्धिक नव्हे तर नैतिक ऊब. म्हणूनच शुक्ल यांचा ‘नवा गरम कोट’ म्हणजे त्यांची भाषा आहे. साहित्याच्या कडक हिवाळ्यातही जिच्यात माणूस टिकून राहू शकतो अशी भाषा.
शुक्ल विचारासारखे चालतात. त्यांच्या चालण्यात गोंगाट नाही, घोषणा नाहीत, प्रसिद्धीचा आग्रह नाही. रस्त्यांवर पोस्टर नाहीत, सभांमधून भाषणं नाहीत. त्यांच्या लिखाणात कुठलाही जाहीरनामा सापडत नाही. पण तरीही त्यांचं लेखन राजकीय आहे, सामाजिक आहे, नैतिक आहे. ही राजकीयता घोषणेतून नाही, तर संवेदनांच्या शांत तडफडीमधून येते. म्हणूनच त्यांचं कृतित्व ओरडत नाही, पण आत खोलवर झिरपत जातं.
अनेकदा शुक्ल यांचा पाठलाग करणारा वाचक रबरच्या चप्पलात असतो म्हणजे आपल्या सवयींमध्ये, आपल्या ठराविक अर्थलावण्यात, आपल्या परिचित समीक्षाभाषेत. पण शुक्ल यांचा वेग वेगळा आहे. ते गुंतागुंत साधी करून पुढे जात नाहीत; उलट ते साधेपणाच्या आतली गुंतागुंत जपून पुढे निघून जातात. त्यामुळे वाचक अनेकदा मागे पडतो. पण हे मागे पडणं पराभवाचं नाही; ती दीक्षा आहे. शुक्ल यांचं साहित्य वाचण्याची पहिली अटच ही आहे
आपल्या गतीचा त्याग करणे. त्यांचं जीवन आणि लेखन हे सकाळच्या सहा वाजल्यासारखं आहे. हलकंसं धुकं, सौम्य ऊन, कामावर निघालेली माणसं आणि आतली दुनिया जागी होण्याचा क्षण. ना पूर्ण रात्र, ना पूर्ण दिवस मधला, संक्रमणाचा काळ. त्यांच्या कथांमध्ये, कवितांमध्ये झाडाखाली उभा असलेला माणूस वारंवार भेटतो. हा माणूस मंचावर नाही, तो प्रकाशझोतात नाही. तो सावलीत आहे. पण ही सावली लपवणारी नाही; ती संरक्षण देणारी आहे. शुक्ल यांची पात्रं, त्यांचा आवाज, त्यांची दृष्टी सगळी सावलीत उभी आहे. चमक-दमक टाळूनही साहित्याच्या सगळ्यात जिवंत भागात उपस्थित.
“धुक्यात माणसाच्या डागाच्या आत तो माणूस होता”ही ओळ केवळ काव्यात्मक नाही, ती आत्मचरित्रात्मकही आहे. सार्वजनिक जीवनाच्या धुक्यात शुक्ल डागासारखे दिसतात कमी प्रचारित, कमी दिसणारे. पण त्या डागाच्या आत एक संपूर्ण लेखक आहे, एक संपूर्ण नैतिक ताप आहे. त्यांचं कृतित्व बाहेरून कमी, आतून अधिक आहे. आजच्या प्रसिद्धीप्रधान साहित्यविश्वात ही आतली घनता दुर्मिळ ठरते. शुक्ल यांची खासियत अशी की ते प्रतिरूपालाही वास्तव बनवतात. झाडाचा डाग झाडासारखाच वाटतो, रद्दी जातीच्या घोड्याचा डाग रद्दी जातीच्या घोड्यासारखाच. ते रूपक लादत नाहीत; ते जीवन त्याच्या डागांसह उचलून आणतात. म्हणूनच त्यांची वाक्यं पहिल्या नजरेला साधी वाटली, तरी ती आयुष्याची हुबेहूब रचना असतात. समाजाने ‘रद्दी’ ठरवलेले लोक, हाशियावर ढकललेले जीव, अदृश्य श्रमहे सगळं त्यांच्या साहित्यात केंद्रस्थानी येतं.
घोडा भुकेला असतो, म्हणून त्याच्यासाठी धुकं हवेत गवतासारखं उगवतं ही करुण कल्पना शुक्ल यांच्या लेखनाची खरी ओळख आहे. त्यांची भाषा भुकेसमोर हार मानत नाही. ती फसवणूक करत नाही, पण जगण्यासाठी आधार देते. म्हणून शुक्ल यांचं लेखन गरिबीवर रडत बसत नाही; ते गरिबीला पाहण्याजोगं बनवतं आणि त्याच्यातून एक शांत सहारा उभा करतं.
“अनेक घरं, अनेक झाडं, अनेक रस्ते होते पण घोडा एकटाच होता.” ही ओळ त्यांच्या सभ्यता-आलोचनेचं सार सांगते. प्रचंड रचना आहेत, व्यवस्था आहे, प्रगती आहे.
पण श्रम एकटे आहेत. “मी घोडा नव्हतो” इथे लेखकाचा विनय आहे. शुक्ल कधीही पात्रांच्या वेदना हडप करत नाहीत. ते त्यांच्या दुःखात उतरतात, पण त्यांची जागा घेत नाहीत. हीच त्यांची नैतिक शुद्धता आणि साहित्यिक गरिमा आहे. झाडाखाली स्थिर उभा असलेला मालक आणि त्याच्यासाठी धावणारा, बुटात घोड्याच्या नालीसारखी नाल ठोकलेला माणूस हा त्यांच्या संपूर्ण साहित्याचा सामाजिक नकाशा आहे. व्यवस्था सावलीत उभी आहे; श्रम धापा टाकत आहेत. पण हे सत्य शुक्ल घोषणा करून सांगत नाहीत. ते एक दृश्य उभं करतात. आणि ते दृश्य वाचकाच्या मनात फार काळ टिकून राहतं.
म्हणूनच विनोदकुमार शुक्ल हे केवळ साहित्यिक नाहीत; ते एक नैतिक अनुभव आहेत. त्यांच्या भाषेचा नवा गरम कोट आजही आपल्याला घालावा लागतो कारण हिवाळा अजून संपलेला नाही.
विकास परसराम मेश्राम
मु+पो, झरपडा,ता, अर्जूनी/मोर, जिल्हा गोंदिया
मोबाईल नंबर -7875592800
vikasmeshram04@gmail.com