Jesus' Life Story : जॉर्डन नदी, येशू आणि ख्रिस्ती धर्म
इस्त्रायलमधील जॉर्डन नदी आणि येशू यांचं काय नातं आहे? ही नदी ख्रिस्ती धर्मातील लोकांसाठी महत्त्वाची का? बेथलहेम या प्राचीन शहरातील येशूच्या जन्मस्थानी आणि नदीवरील आपला अनुभव सांगताहेत डॉ. सुभाष देसाई
Jesus' Birthplace जेरुसलेमपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर वसलेले Bethlehem बेथलहेम हे एक प्राचीन आणि ऐतिहासिक शहर आहे. जेरुसलेमच्या दक्षिणेस, जुडीएच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या या शहरात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. ओल्ड टेस्टामेंट म्हणजे जुन्या करारात या शहराचा उल्लेख एफ्राता या नावाने आढळतो. Hebrew हिब्रू भाषेत बेथलहेम याचा अर्थ आहे “भाकरीचे घर” जीवन पोसणारे, जगणं देणारे घर.
याच भूमीत दावीद नावाचा एक साधा मेंढपाळ देवाच्या आदेशाने पराक्रमी राजा बनला. त्याच कुळात पुढे योसेफ याचा जन्म झाला तो मरियेचा पती आणि येशूचा पालक पिता. या परंपरेमुळे बेथलहेम अजरामर झाले. आजही या शहरात ख्रिस्ती लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
राजा हेरोद याच्याकडून बाल येशूच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने मरिया-योसेफ हे कुटुंब इजिप्तमध्ये पलायन करते. हेरोदच्या मृत्यूनंतर ते नाझरेथ या आपल्या गावात परत येतात. तेव्हा येशू साधारण दोन वर्षांचा होता. इजिप्तमध्ये दोन वर्षे वास्तव करूनही हे कुटुंब तेथील समाजाशी एकरूप होऊ शकले नाही. कारण इतिहासात यहुदी लोक कधीकाळी इजिप्तमध्ये गुलाम होते आणि त्याची छाया समाजमनावर अजूनही होती.
नाझरेथमध्ये येशू निसर्गाच्या सान्निध्यात, पशुपक्ष्यांमध्ये आनंदाने वाढला. योसेफ हा त्याचा जनक पिता नसला, तरी त्याने येशूला पूर्ण पितृप्रेम दिले. येशू चौदा वर्षांचा असताना योसेफचे निधन झाले. त्या काळात रोमन सैनिक यहुद्यांना गुलामांसारखी वागणूक देत असत. हे अन्यायाचे चित्र पाहून येशू अंतर्मुख झाला; त्याच्या करुणेची बीजे येथेच रुजली.
जॉर्डन नदी इजराइल आणि जॉर्डन यांना विभक्त करते. हा प्रदेश अत्यंत रम्य आहे. याच नदीकाठी योहान बाप्तिस्मा देत असे. येशू त्याच्याकडे गेला व म्हणाला, “मी बाप्तिस्मा घेण्यासाठी आलो आहे.” जॉर्डन नदीत स्नान केल्यानंतर योहानने येशूला दीक्षा दिली. येशू प्रार्थना करीत असताना पवित्र आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरला, आकाश उघडले आणि आकाशवाणी झाली.
“Thou art my beloved Son; with thee I am well pleased.”
मी स्वतः जॉर्डन नदीच्या त्या काठावर गेलो आहे. तो भाग हिरवागार, शांत आणि पवित्रतेची अनुभूती देणारा आहे. तेथे जगातील विविध भाषांत येशूच्या साक्षात्काराची कथा कोरलेली आहे.
जगभरातील ख्रिश्चन बांधव श्रद्धेने येथे स्नान करतात. ज्याप्रमाणे हिंदू काशी-हरिद्वार किंवा कुंभमेळ्यात पवित्र स्नान करतात. गौतम बुद्धांच्या साक्षात्काराचा निरंजना नदीकाठ, शीख धर्मातील हेमकुंड, किंवा आपल्या संतांची समाधीस्थळे, या सर्व ठिकाणी मला एकच आध्यात्मिक तत्त्व जाणवले: जलतत्त्वाचे पावित्र्य आणि आत्मशुद्धी.
या दीक्षेनंतर येशूचे खाजगी जीवन संपले. तो केवळ नाझरेथचा किंवा आईचा पुत्र राहिला नाही, त्याचे जीवन विश्वव्यापी झाले. रोमन साम्राज्याचा विस्तार सर्वत्र झाला होता. पॅलेस्टाईनवर रोमन सत्ता होती आणि जकात लादली गेली होती. समाज परमेश्वराला विसरून सुखाच्या मागे धावत आहे, हे पाहून येशूने लोकांना पुन्हा ईश्वराकडे वळवण्याचे कार्य सुरू केले.
त्या काळात धर्मविधी, कर्मकांड, उपास–तापास, यज्ञ-याग यांचे प्रस्थ माजले होते. बाह्य विधींनी परमेश्वर प्रसन्न होतो, असा भ्रम पसरवला गेला होता. येशूने आंतरिक भक्ती, करुणा आणि प्रेमाचा मार्ग शिकवला.
डॉ. सुभाष के. देसाई
📞 ९४२३०३९९२९