तंत्रज्ञानातील जिनियस : प्रा. डॉ.आर जी.सोनकवडे

करोना महामारीच्या काळात समाजाचा कणा बनून करोना विषाणू नष्ट करण्यासाठी संशोधन करुन वेगवेगळी तंत्र विकसित करणारे प्रा. डॉ.आर जी.सोनकवडे… आज २३ व्या तंत्रज्ञान दिवसानिमित्त या झपाटलेल्या भारतीय मराठी तंत्रज्ञ व त्यांच्या महान तंत्रज्ञानाच्या किमयेची ओळख सर्वसामान्यांस व्हावी यासाठी श्रद्धा वाईकर यांनी केलेला हा लेखनप्रपंच...

Update: 2021-05-11 05:48 GMT

  ११ मे १९९८ रोजी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दाखवली. या प्रगतीचे प्रतीक म्हणून ११ मे हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. ११ मे हा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. या दिवशी देशात तंत्रज्ञानाची क्रांती झाली. ११ मे १९९८ मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे भारताने तीन यशस्वी अणु चाचण्या केल्या. या चाचणीचे सांकेतिक नाव होते, 'ऑपरेशन शक्ती.' या चाचण्यांचे शिल्पकार होते, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. आर. चिदम्बरम, डॉ. अनिल काकोडकर आणि डॉ. के. संथानम्. अणुचाचण्यांमुळे भारत जगभरात अणुशक्ती क्षेत्रात प्रगत म्हणून प्रकाशझोतात आला.११ मे १९९८ रोजी भारताने, अणुगर्भीय चाचण्या साखळ्यांतील, पोखरण-२ प्रकल्पातील शक्ती-१, शक्ती-२ आणि शक्ती-३ या अणुस्फोट चाचण्या यशस्वीरित्या घेतल्या. या पहिल्या अणुस्फोट चाचणीला बुद्धाने स्मितहास्य(बुद्धा स्माईल्ड) केले असे संबोधले गेले. ११ मे १९९८ हा पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा झाला. तंत्रज्ञान हे मानवी संस्कृती घडविणाऱ्या घटकात शासन व्यवस्था समाजरचना, कर्म, तत्त्वज्ञान यांच्या इतकेच महत्त्वाचे आहे असे मानले जाते. भारताचे तंत्र सामर्थ्य वेळोवेळी दिसून आलेले आहे हे भारत मातेच्या सुपुत्रांमुळेच.


 



आज २३ व्या तंत्रज्ञान दिवसानिमित्त अशाच एका झपाटलेल्या भारतीय मराठी तंत्रज्ञ व त्यांच्या महान तंत्रज्ञानाच्या किमयेची ओळख सर्वसामान्यांस व्हावी यासाठी केलेला हा लेखनप्रपंच...

कोरोनाच्या कृष्णछायेतून सावरण्याकरिता शासनाने टाळेबंदीचा पर्याय निवडला, यामध्ये सर्व जनजीवन विस्कळीत झाले. परंतु या काळात समाजाचा कणा बनून लढणाऱ्या कोरोना योध्यांमध्ये असणारे अग्रगण्य नाव प्राध्यापक डॉ. राजेंद्र गिरजाप्पा सोनकवडे. मग त्यांना आज संपूर्ण भारत 'सॅनिटायझर टनेल मागचं ब्रेन','यु. व्ही.टॉर्च चे महाराष्ट्रीयन पितामह','तारा रोबोटचे जन्मदाता','मन जिंकणारा संशोधक' अश्या अनेक नावांनी ओळखत आहे. एक उत्कृष्ट प्राध्यापक, प्रतिभावंत संशोधक, संवेदनशील व सामाजिक जाण असणारे विचारशील लेखक अशी कितीतरी बहुरुपे त्यांची आपणास पाहावयास मिळतात. आत्मविश्वास,प्रचंड सकारात्मकता, कमालीची उत्साही वृत्ती, बेभानपणे सतत कार्यमग्न राहण्याची प्रवृत्ती, विज्ञानाबरोबरच तंत्रज्ञानाचा अट्टाहास अश्या अनेक गुणांची ओळख सरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वामध्ये होते.



 



'कमी तिथे आम्ही' असे प्रत्येक आणीबाणीच्या काळात जगाच्या आर्त विनवणीस साद घालण्याचे काम प्रा. सोनकवडे नेहमीच करतात. कारण when going get tough, tough gets going हे तत्व त्यांनी अंगिकारले आहे, आणि 'इदं न मम्'तितक्याच मोठ्या मनाने सहजपणे म्हणून आपल्या कार्याचे श्रेय इतरांना देतात आणि जगभराच्या कौतुक व आदरास पात्र होतात. आणि यामुळेच ते जगभरात अजूनच लोकप्रिय होतात. खरे तर तंत्रज्ञानामध्ये प्रगती केल्यानंतर परकीय देशांच्या दादागिरीची झळ सरांच्या कार्यापर्यंत सुद्धा परिणाम करून गेली. सर जेव्हा पूर्वीच्या न्यूक्लिअर सायन्स सेंटर नवी दिल्ली येथे म्हणजेच आजचे आंतरराष्ट्रीय त्वरक केंद्र (IUAC)येथे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत होते, तेव्हा पोखरण येथील अणुचाचणी-२ नंतर अमेरिकेने या संस्थेतील कार्यपद्धतीस सहकार्य करण्यात दिरंगाई करण्यास सुरुवात केली. या संस्थेच्या नावावरून अमेरिकेने असा अंदाज वर्तवला की येथे अणू बॉम्बशी संबंधित काहीतरी कार्य चालत असावं. सरांच्या संशोधन कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील आण्विक कार्यासंबंधीत महत्वाच्या निर्णयावर नियंत्रण ठेवणाऱ्या एकमेव अणुऊर्जा सेवा संस्थेने (IAEA)घेतली व त्यांना आमंत्रित केले, त्यावेळी सरांच्या राहण्याची, येण्या-जाण्याची व इतर तत्सम सोयीसुविधांची चोख व्यवस्था या अणुऊर्जा सेवा संस्थेने पार पाडली. परंतु, त्याच वेळी अमेरिकेने त्यांचा व्हिसा नामंजूर करून अल्प प्रमाणात का होईना पण अरेरावी केली.

मागील वर्षापासून जगावर कोरोनाचे सावट आहे. भारतासारख्या लोकसंख्येचे माहेरघर असणाऱ्या देशाला याची झळ वाजवीपेक्षा जास्त जाणवते आहे. परंतु फक्त समस्येचे अवडंबर न माजवता विचारास कृतीची जोड देऊन कार्यमग्न राहण्याची शिकवण सर त्यांच्या कार्यातून देतात.

उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः |

षडेते यत्र वर्तन्ते तत्र देव सहायकृत्

|अर्थातच उद्यमी, साहसी,धैर्यवान,प्रतिभावान, बलशाली आणि पराक्रमी अश्या या सहा गुणांच्या बळावर जे कार्यरत राहतात त्यांना प्रत्यक्ष परमेश्वर पण साहाय्य करत असतो. आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर तंत्रज्ञानाची किमया जाणून घेऊन अवघ्या सहा महिन्यात एक ना अनेक अद्भुत आविष्कारांनी त्यांनी सर्वांनाच अचंबित केले आहे. त्यापैकी काही विशेष उल्लेखनीय संशोधने-

१)सॅनिटायझर टनेल:निर्जंतुकीकरणातील अग्रगण्य नाव:

मुंबई च्या ICT (Institute of Chemical Technology) च्या मदतीने अत्याधुनिक व कमी खर्चात 'सॅनिटायझर टनेल' निर्मितीमध्ये सोनकवडे सरांची कामगिरी मोलाची ठरते. या प्रकल्पामध्ये त्यांनी ते टनेल डिझाइन करण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. पाण्यात १% सोडियम हायपोक्लोराईडच्या मिश्रणाचा वापर केला जातो. टनेलमधून जाताना ४-५ सेकंद वेळ व्यक्तीला लागतो. त्या कालावधीत फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण केले जाईल. या टनेलचे मॉडेल म्हणून १२ फूट लांबीचा पोर्टकेबिनचा वापर केला आहे. नोजलद्वारे निर्माण होणाऱ्या धुक्याच्या अधिक चांगल्या वितरणासाठी संगणकामध्ये सॉफ्टवेअर डिझाइन व सिम्युलेट केले आहे. या टनेलमुळे रेल्वे स्टेशन, बस-स्थानक, भाजी मंडई, कार्यालये, विद्यापीठे, रुग्णालये यांच्या प्रवेशद्वारावरच निर्जंतुकीकरण शक्य होईल. कोरोनाशी लढा देण्यासाठी कमी खर्चात या अलौकिक उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे.





 


 


२)यु. व्ही. टॉर्च : एक संरक्षक कवच



 


विषाणूंना निष्क्रिय करण्याकरता सर्वोत्तम पर्याय म्हणजे अतिनील किरणे. अतिनील किरणांचा वापर करून प्राध्यापक सोनकवडे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत सोनकवडे व पूनम सोनकवडे यांनी या अतिनील किरणांच्या विजेरीची निर्मिती केली आहे. या टॉर्चचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यातील अतिनील किरणे मानवी शरीराच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता निर्जंतुकीकरण घडवून आणतात. याचा वापर आपण घरगुती कामकाज, कार्यालय यांसारखे सर्व ठिकाणी सहज करु शकतो. दैनंदिन जीवनात आपल्याला विविध वस्तूंना कळत-नकळतपणे स्पर्श होत असतो यातूनच विषाणूंचे संक्रमण होण्याची दाट शक्यता असते. अशा विषाणूंवर अतिनील किरणांचा मारा झाला तर विषाणूंच्या RNA ची रचनाच बदलून जाते आणि असे विषाणू नष्ट होतात, हे तंत्र प्राध्यापक सोनकवडे यांनी अवगत करून या टॉर्चची निर्मिती त्यांनी केली आहे. १६,२२ आणि ३३ वॅट एवढ्या क्षमतेच्या अतिनील किरणांचा पुरवठा करणारी ही टॉर्च असून कोरोना तत्सम विषाणू नामशेष करण्याचा रामबाण इलाज जणू समाजासमोर या निर्मिती मधून सोनकवडे सरांनी मांडलेला आहे. या टॉर्चचा वापर करून वायू वाहने (विमाने,हेलिकॉप्टर्स),बस निर्जंतुक करता येऊ शकतात. त्याचबरोबर मोबाईल, संगणक, कीबोर्ड, फळे-भाजीपाला, पिण्याचे पाणी इत्यादीचे निर्जंतुकीकरण या उपकरणाद्वारे करता येते.

३)तारा रोबोट:

तारा रोबोट या नावाने परिचित असणाऱ्या रोबोटला यु. व्ही.३६०सॅनिटायझर मॉड्युल' असेही ओळखले जाते. या रोबोट मुळे कोरोना विषाणू तत्सम सूक्ष्मजीवांची निर्जंतुकीकरण करणे सहजसाध्य होते.



 


आपण बाहेर जाताना किंवा घराबाहेर असताना कितीही काळजी घेतली तरी नकळतपणे आपला विविध ठिकाणी स्पर्श झालेला असतो. यासाठी आपण सतत ज्या ठिकाणी वावरतो त्या जागांचे निर्जंतुकीकरण करणे हा एकमेव उपाय ठरतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या रोबोटची निर्मिती ही अत्यंत महत्वाची आणि लाभदायक अशी गोष्ट आहे. या रोबोटची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे रोबोटमध्ये वापरलेले वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आणि AI (Artificial Intelligence) तंत्रज्ञान. मानवी उपस्थितीत मानवी हालचाली अचूकपणे ओळखून तात्काळ अतिनील किरणांचे उत्सर्जन थांबवण्यासाठी यामध्ये PIR सेन्सर वापरला आहे. तसेच रूममध्ये फिरताना अडथळ्यांवर थडकून तो खराब होऊ नये यासाठी Anticollision सेन्सर वापरला आहे. निर्जंतुकीकरणाच्या ठिकाणाचे मोजमाप घेण्यासाठी LIDAR सेन्सर बसवला आहे. त्यामुळे रोबोट त्याच्यामध्ये असणाऱ्या ३६० अंश स्कॅनरच्या साहाय्याने द्विमिती किंवा त्रिमितीमध्ये मोजमाप घेऊन त्यानुसार निर्जंतुकिकरणासाठी लागणारी वेळ स्वतःच निश्चित करतो. प्रभावी निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त simulations Ansys Software Pvt. Ltd. & CADFEM यांनी पुरवली आहेत. २० किलोग्रॅम वजन असणाऱ्या या रोबोटची १० बाय १० मापाची खोली अवघ्या ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत निर्जंतुक करण्याची क्षमता आहे. यामध्ये वापरलेल्या ११ वॅटच्या एकूण १८ UV-C टयूबमुळे कोरोना विषाणूसोबत इतर विषाणू व जिवाणूंचाही नायनाट करणे शक्य होणार आहे.

रोबोटमध्ये वापरलेल्या लिथियम आयन बॅटरी मुळे चार तास चार्ज केल्यानंतर तो दोन ते अडीच तास कार्यरत राहू शकतो. या रोबोटसाठी बनवलेल्या खास अशा अँड्रॉइड ऍपच्या मदतीने अगदी कुठूनही त्याला चालावणे शक्य आहे. मोबाइल WiFi द्वारे हा काही मीटर अंतरावरून हाताळला जाऊ शकतो. याही पलीकडे जाऊन हा रोबोट IOT (Internet of Things) तंत्रज्ञानाद्वारे अगदी परदेशातूनही चालवता येतो. याव्यतिरिक्त त्याची कार्यस्थिती समजण्यासाठी त्यावर LED बसवले आहेत. हिरव्या रंगाचे LED त्याची चालू स्थिती दर्शवतात तर जेव्हा तो UV-C tube चालू करून निर्जंतूकीकरणाचे काम सूरू करतो तेव्हा लाल रंगाचा LED लागतो. रोबोटच्या डोक्यावर बसवलेल्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्या ठिकाणची सर्व दृश्ये पाहणेही आपणास शक्य होईल. कोविड -१९ वॉर्ड, मोठमोठे मॉल, रुग्णवाहिका, हॉटेल्स, उपहारगृहे, सार्वजनिक वाहने, खासगी हॉटेल्स, विमानतळ व प्रवाशी कक्ष, रेल्वे, रेल्वेमधील स्वयंपाक कक्ष, धान्य कोठी, घर, कार्यालये, व्यायामशाळा, महाविद्यालये, कारखाने, किरणादुकान, सिनेमागृह, बँक, सार्वजनिक शौचालये इ. ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी हा रोबोट अत्यंत लाभदायक ठरेल. या रोबोटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्यासोबत बोलूही शकतो आणि कोरोना व इतर विषाणू, सूक्ष्मजीव, विकिरणे, विद्युतचूंबकीय लहरी, अतिनील किरणे अशा अनेक वैज्ञानिक बाबींवर माहितीही देऊ शकतो.

विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या उद्देशाने प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी केलेल्या या समाजकार्यास संपूर्ण देशभरातून अनेक सदिच्छा व आशीर्वाद तर लाभत आहेत. येणाऱ्या परिस्थितीपुढे हात न टेकता परिस्थितीशी दोन करण्याची शिकवण यातून आपणास मिळते. परिस्थितीचा डंका पिटण्यापेक्षा त्यावर समस्या शोधण्याची विचारशैली व विधायक कृती या गुणांनी समृद्ध असणाऱ्या या तंत्रज्ञाची व त्यांच्या महान तंत्राची दुनिया आजन्म ऋणी राहील. तंत्रज्ञान दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगावसं वाटतं की ज्यांना तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेण्याचे जरा जरी कुतूहल असेल त्यांनी सरांच्या महान कार्याची ओळख करून देणारा रस्ता थोड्या प्रमाणात तरी नक्कीच अवलंबावा. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला तर त्यांच्या अल्पावधीतील संशोधनातील अफाट कामगिरी पाहून आपण 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' असे उद्गार काढल्याशिवाय राहणारच नाही. असा हा 'प्रज्ञासूर्य' आपल्या ज्ञानाच्या तेजाने सर्वांचा अज्ञानरूपी तिमिर दूर करत असतो, तेव्हा Winning international award is one thing but winning common heart is most precious things. हे वाक्य त्यांना तंतोतंत लागू पडते. अशा प्रकारे भविष्यात ही त्यांनी अनंत कार्यांनी क्षितिजाला गवसणी घालून ज्ञानरूपी आसमंतात उंचच उंच स्वैर करावे. तसेच तळमळीने कार्य करणारे अशा असाधारण तंत्रज्ञाची मराठी वाचकांनी सुद्धा दखल घ्यावी. कुतूहल, धाडस, जिद्द, स्वयंशिस्त, अपार मेहनत, विजय म्हणजेच प्रा. डॉ. सोनकवडे सर असेच समीकरण तयार होते. त्यांच्या सातत्याने उंचावणाऱ्या कर्तृत्वाची आम्हाला साधी तरी ओळख व्हावी व ती समजून घेण्याची कुवत या विधात्याने आम्हा सामान्य जनसामान्यांमध्ये निर्माण करावी ही आजच्या तंत्रज्ञान दिनी विधात्या चरणी प्रार्थना.

श्रद्धा वाईकर

(लेखिकेचा परिचय - 'विज्ञानवाटा' ब्लॉग मध्ये विज्ञानातील मूलभूत शोध तसेच चालू असलेले संशोधन या विषयांवर लेखन, 'आकाश कवेत घेताना'या पुस्तकाचे लेखन )

संपर्क-

भ्रमणध्वनी क्र.९३२२१३९८४०

ई-मेल:

shraddhak.waikar@gmail.com

Similar News