Women's Empowerment : "सुनेत्रा पवार यांच्यामुळे उपमुख्यमंत्री पदाला एक गरिमा येईल."

सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय... कुणाच्या फायद्याचा? सुनेत्रा पवारांमुळे महिला सक्षमीकरणाकडे राज्याचे एक पाऊल पुढे पडले आहे. पुरुषप्रधान राजकारणात चांगुलपणा, पारदर्शकता व संवेदनशीलता आणण्यात सुनेत्राताई यशस्वी ठरतील का? वाचा श्रीनिवास खांगटे यांचा लेख

Update: 2026-01-31 03:00 GMT

First Woman Deputy Chief Minister Maharashtra नेहमीच अत्यंत शालीन, घरंदाज भासणाऱ्या माननीय विद्यमान खासदार सुनेत्रा पवार यांची दादांच्या राजकीय उत्तराधिकारी म्हणून होऊ पहात असलेली निवड अजिबात अनपेक्षित नाही. किंबहुना हा अत्यंत स्मार्ट आणि भविष्यवेधी निर्णय आहे. हा केवळ राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय नसावा.. त्यामागे महाराष्ट्र आणि दिल्लीच्या अदृश्य महाशक्तींचा विचार असू शकतो. राज्यसभेच्या खासदार म्हणून सुनेत्रा पवार यांचा दिल्लीत वावर वाढला होता. दादांना दिल्लीत सातत्यानं फेऱ्या न मारताही सहयोगी बलाढ्य पक्षाच्या श्रेष्ठींचा उत्तम पाठिंबा राहिला आहे.! अर्थात पवार कुटुंब आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ प्रमुख, देशाचे नेते सन्माननीय शरद पवार यांच्या पाठिंब्याशिवाय आणि होकाराशिवाय हा निर्णय पूर्णत्वाला जाईल असे शक्य नाही.!

राज्याचे क्रमांक दोनचे कार्यकारी पद त्यांच्या कुटुंबातच त्यांच्या ज्येष्ठ सूनबाईंच्या रूपाने कायम राहत आहे. असंही आपल्या देशाचा राजकीय कुटुंबातून आलेल्या वारशाची सकारात्मक परंपराही आहे. स्वयं दादाही त्याच वारशातून पुढे आले होते.. अर्थात त्यानंतर स्वतःला सिद्ध करावे लागते जे दादांनी ठळकपणे करून दाखवले होते.!

महाराष्ट्रातील भाजपा सरकारला कोणत्याही अटी शर्तींशिवाय दिलखुलास पाठिंबा देणाऱ्या, सातत्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बऱ्यावाईट काळात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या, बाटगा होऊन जोरजोराने बांग न देताही सामंजस्य पाळून स्वतःचा आत्मसन्मान जपणाऱ्या स्वर्गीय दादांना ही न मागता मरणोत्तर मिळणारी बक्षिसी आहे. या सर्वसमावेशक निर्णयामुळे अनेक पक्षी एका बाणामध्ये टिपण्यात आले असावेत इतका हा निर्णय भन्नाट आहे.

एका सुशिक्षित, घरंदाज महिलेला उपमुख्यमंत्री करून देशांत, राज्यात महिला सक्षमीकरणाचा सकारात्मक संदेश दिला जात आहे.. असंही देशभरात या दशकांत महिलांचा बोलबाला आहेच. विश्वचषक जिंकणाऱ्या महिलांचा, देशाच्या सर्वच क्षेत्रांत धडाडीने पुढे जाणाऱ्या महिलांचा सर्वत्र कौतुकास्पद वावर सुरूच आहे. सासर आणि माहेर. दोन्हीकडची सशक्त राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या सुनेत्राताईंना राजकीय शकट चालविण्याचे बाळकडू घरातच मिळालेले असल्यानं फार काही अवघड असे त्यांना काहीच नसेल.!

सन्माननीय सुनेत्रा अजित पवार यांची व्यक्तिगत पाटी कोरी आणि स्वच्छ असल्यानं, त्यांच्या वागण्या बोलण्यात भैताड अभिनिवेश आणि काही विशिष्ट महिला राजकारण्यांसारखी चमकोगिरी नसल्यानं उपमुख्यमंत्री पदाला एक गरिमा येईल.! पण काहीही म्हणा, त्यांचेकडे पाहून आपोआप एक आदराची भावना मनात येते असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. हे सारं झालं राजकीय. खरं तर प्रचंड लोकप्रिय पतीच्या हादरवणाऱ्या मृत्यूनं त्यांच्या मनमेंदूवर काय आघात झाला असेल याचे इतर कुणालाही अंदाज येऊ शकणार नाहीत. हा धक्का पचवणे एका पत्नीला, स्त्रीला निश्चितच सोपे नसेल.!

पण दोन तरुण मुलांची आई असलेल्या स्त्रीला सगळे धक्के पचवून आयुष्याच्या रणांगणात उभे राहावेच लागते. मग ती राजाची राणी असो. की गरीबाघरची स्त्री.. राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वोच्च नेता म्हणून जबाबदारी स्वीकारण्याचा आव्हानात्मक निर्णय परिपक्वतेचा वाटतो.. आज सोशल मीडिया आणि सर्वच माध्यमांमधून, समाजाच्या सर्व थरांमधून या निर्णयाचे झालेले उत्स्फूर्त स्वागत पाहता.. सारं काही उत्तम आणि घडी बसवणारे होईल यामध्ये शंका वाटत नाही.!

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उच्च शिक्षित, परिपक्व, सुसंस्कृत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही चांगले लोकनेते आणि सभ्य सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे शांत, शालीन..भक्कम वाटणाऱ्या सुनेत्रा पवार यांचे तिसरा कोन म्हणून महाराष्ट्राच्या सत्ताकारणाला जोडले जाणे ही चांगली बाब वाटते आहे.!

दादांचा अकाली मृत्यू हा अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे. पण त्यानंतर प्रथम दादांचं घर, कुटुंब..आणि त्यांचा आवडता महाराष्ट्रही सावरणार असेल तर.. न जाणो कदाचित महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व म्हणून हयातीत आणि मरणोत्तरही सिद्ध झालेले अजितदादाही अवकाशातून सुखावतील..

राज्याच्या होऊ घातलेल्या भावी उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा..

नवीइनिंग

महिलाराज..

Similar News