Arvind Patkar passes away : प्रदूषणाविरुद्ध आमरण उपोषण करणारा खराखुरा ॲंग्री यंग मॅन अरविंद पाटकर !
अरविंद पाटकर यांच्या स्मरणार्थ डॉ. प्रदीप आवटे यांचा लेख
Arvind Patkar passes away फार फार तर आठ दहा दिवस झाले असावेत. अरविंद पाटकरांचा फोन आला.
“ डॉक्टर , फ्री आहात ना ? कुठं आहात दिल्लीत की पुण्यात ?” दोन मिनिटं बोलू शकतो ना,असं म्हणत त्यांनी मला आमच्या लेखन प्रकल्पाची आठवण करुन दिली. ‘महिनाभरात माझ्या हातात पाहिजे बरं तुमचं पुस्तक,’ असा प्रेमळ दम देऊन पाटकरांनी फोन ठेवला आणि आज ही बातमी – पाटकर गेले.
कधी ते आठवत नाही पण कधी तरी बोलता बोलता त्यांनी सांगितलेलं , “ लग्नाच्या पहिल्या रात्री मी पोलिस कोठडीत होतो,” अर्थात कुठल्या तरी सामाजिक आंदोलनात भाग घेतल्यामुळे. लग्नाची पहिली रात्र कोठडीत घालवणा-या त्या चळवळया माणसाकडे तेव्हा मी नुसता आ वासून पाहत राहिलो. वाटलं, हा माणूस नुसता पुस्तकं काढणारा नाही, हा पुस्तकात न मावणारा ऐवज आहे. लालबाग भागात घडलेला हा कॉम्रेड. ऑल इंडिया यूथ फेडरेशन, गिरणी कामगार युनियन, कम्युनिस्ट पक्ष असा सारा प्रवास. बॉम्बे गॅस कंपनीच्या प्रदूषणाविरुध्द आमरण उपोषण करणारा खराखुरा ॲंग्री यंग मॅन. असा चळवळया माणूस पुस्तक प्रकाशनाकडे वळला.
अरविंद पाटकर. मनोविकास प्रकाशन. ही दोन नावे महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीत रुजलेली नावं. माझी पाटकरांची पहिली ओळख झाली ती संजूच्या बराक ओबामावरील पुस्तक प्रकाशनाच्या वेळी. त्यांचा मिश्किल स्वभाव त्या छोटयाशा भेटीतही लक्षात राहिला. नंतर काही काळाने मी पुण्यात आल्यानंतर विविध कार्यक्रमात भेट होत राहिली. महावीरभाईंचा अमृतमहोत्सव त्यांच्याच कुशल संयोजनाखाली आम्ही सगळया मित्रांनी साजरा केला. त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा होता. आणि खटयाळपणा एखाद्या शाळकरी मुलासारखा. त्याच वयाच्या मुलांसारखे ते जिद्दी आणि प्रसंगी हट्टीही होते. ‘ बदलता भारत’ सारखा महत्वाकांक्षी पुस्तक प्रकल्प ते विलक्षण जिद्द आणि चिकाटीनेच हाती घेत असत.
लिखाणापासून दूर असणा-या अनेकांना त्यांनी लिहितं केलं. त्यांना माणसांची जाण होती. त्यांना माणसं वाचता यायची. कोणत्या माणसात पुस्तक दडलं आहे, हे त्यांना उमजायचं. त्यांचं पुस्तक प्रेम माणसांवरील जिव्हाळयातून उमललं होतं. म्हणून तर महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यात पुस्तक दुकानं इतकी कमी, अनेक जिल्ह्यांत तर अशी दुकानेच नाहीत, याची त्यांना खंत वाटायची. प्रकाशन व्यवसाय त्यांच्यासाठी व्यवसाय आणि चळवळ यांचा संगम होता.
महावीर भाईंची पंच्याहत्तरी साजरी करतानाच आम्ही पाटकरांच्या पंच्याहत्तरीला काय करायचं, त्यांच्या लाडक्या तब्बूला बोलवायचं, अशी थट्टामस्करी करत होतो. पाटकर, हा बॉल जरा जपून खेळला असता तर …पण पाटकर पार्टीतून एकदम उठून ‘निघतो, मला रिक्षा मिळणार नाही नंतर,’ असं म्हणावं, इतक्या सहजतेने निघून गेले.
चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं यांची सांगड घालणारा एक सदाहरित माणूस आज हरवला. कॉम्रेड, अखेरचा लाल सलाम !
( साभार - सदर पोस्ट डॉ. प्रदीप आवटे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)