Competition in Family : पार्थ आणि जय पवार यांच्या नेतृत्वाचं काय ?
अजित पवार यांच्यानंतर पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासमोर राजकारणातली कोणती आव्हाने असणार आहेत? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास नेतृत्वासाठी कौटुंबिक स्पर्धा सुरु होईल का?
Ajit Pawar अजित पवार यांनी लढविलेल्या जवळपास सर्वच निवडणुका ते जिंकलेले आहेत. निवडणुक लहान असो की मोठी तितक्याच गांभिर्यानं अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. त्यातही त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून तेव्हाच्या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. पण त्यात ते पराभूत झाले. त्या पराभवानंतर पार्थ हे सक्रिय राजकारणापासून थोडे दूरच गेले. अन् त्यांच्या जागी अजित पवारांचे छोटे चिरंजीव जय पवार हे राजकारणात सक्रिय झाले. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर आता पार्थ आणि जय पवार यांच्या नेतृत्वाची चर्चा सुरु झालीय.
१९९० मध्ये जन्म झालेले पार्थ पवार हे आता ३६ वर्षांचे आहेत. वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेल्या पार्थ यांनी लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतलेलं आहे. कमी बोलणारे, पण ग्राऊंडवर सामान्य कार्यकर्त्यांना सहज भेटणारे अशी पार्थ यांची ओळख आहे. कौटुंबिक कार्यक्रमांव्यतिरिक्त पार्थ हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता राजकारणाच्या सार्वजनिक व्यासपीठांवर तसेच कमीच दिसले आहेत. दुर्देवानं त्यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आणि पार्थ यांनी सक्रिय राजकारणातून स्वतःला दूर नेलं. त्यानंतर अजित पवारांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला अन् स्वतंत्र चूल मांडली. त्यावेळी अगदी सावलीप्रमाणे पार्थ आणि जय पवार हे अजित पवारांच्या सोबत एकत्र दिसले. पडद्यामागच्या घडामोडींमध्येही पार्थ आणि जय पवार हे अधिक सक्रीय झालेले दिसले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या रुपानं अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे सुरु झाला. सार्वजनिक राजकारणात सुनेत्रा पवार या नवख्या असल्या तरी राजकीय व्यवस्थापन, सामाजिक प्रश्नांची जाण, थेट लोकांमध्ये जाऊन प्रश्न समजून घेण्याची त्यांची हातोटी, नम्र स्वभाव याचा राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांच्या पश्चात निश्चितच फायदा होईल. याशिवाय सार्वजनिक राजकारणात आता सुनेत्रा पवार किती सक्रिय होतात, याचा परिणाम हा थेट पार्थ आणि जय पवार यांच्या नेतृत्व घडविण्यावरही होणारच आहे. या दोघांनाही सक्षम नेतृत्व म्हणून उभं करण्याआधीच अजित पवारांची अनाकलनीय एक्झिट झाली. त्यामुळं आता या दोघांच्याही नेतृत्वाची भिस्त ही पूर्णपणे आता सुनेत्रा पवारांच्या पुढील वाटचालीवरच अवलंबून असल्याचं चित्र आहे.
कुटुंबातच नेतृत्वाची स्पर्धा
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार घडले. त्यावेळी पवार कुटुंबात कोणत्याही पद्धतीची स्पर्धा नव्हती फक्त डोळ्यासमोर होतं ते राष्ट्रवादी पक्ष वाढवणं, जनतेचं काम करणं. त्यावेळचं राजकारणही वेगळं होतं परंतु आता तशी स्थिती नाही. अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची धुरा कोण सांभाळणार यावरून पारिवारिक स्पर्धा सुरु होईल. कारण पवार कुटुंबियात एकाच वयातील मुलं आहेत. पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार अशी नावं पुढं आहे. यांच्यातच स्पर्धा होण्याची शक्यता वाटते असं ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी सांगितलं आहे.
Ajit Pawar Death, NCP Succession, Parth Pawar Leadership, Jay Pawar Politics, Sunetra Pawar Rajya Sabha, Rohit Pawar MLA, Yugendra Pawar Politics, Sharad Pawar Retirement, NCP Merger, Maharashtra Deputy CM