Gender Stereotypes : शांभवीचं नाव मिळालं नसतं तर कुठल्या पुरुष वैमानिकावर अशी शंका घेतली असती का?
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या निमित्ताने सोशल मीडिया आणि समाजात एक प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे... विमान मुलगी उडवत होती ना? कशाला मुलीला विमान उडून दिलं ? असे एक ना अनेक प्रश्न जे फक्त सहवैमानिक असलेल्या शांभवीवरचं नाही तर समाजातील प्रत्येक महिलेच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवणारं आहे. या लिंगभेद रुढीवादी विचारांचा खरपूस समाचार घेतलाय लेखक मयुरी डी. यांनी...
Ajit Pawar Plane Crash बारामतीच्या विमान अपघातानंतर अशा कितीतरी पोस्टस पडत आहेत. खरं तर Shambhavi co-pilot शांभवी सहवैमानिक होती. Sumit Kapoor pilot मुख्य पायलट सुमीत कपूर पुरुषच होता. पण चूक झाली की बोट ठेवायला एका बाईचं नाव मिळतंय तर का सोडतील? त्यांचा पिढीजात पितृसत्ताक अहंगंड उफाळून उफाळून वर येतोय.
अजित पवारांनी स्वतः एका ट्विट मध्ये म्हणलं होतं की, जेव्हा जेव्हा सेफ लँडिंग होतं तेव्हा महिला वैमानिक होती असं समजून जायचं. खरं तर पुरुष किंवा स्त्री असणं हे या चूक मोजण्याचे परिमाण का आहे? जगात आजवर हजारो प्लेन क्रॅश झाले आहेत. आणि त्यातला महिला वैमानिकांचा डेटा सरासरी फक्त 3% च्या आसपास आहे. अर्थात महिला वैमानिक आधीच कमी आहेत. त्यामुळे जसं पुरुषांकडून अपघात झाला की त्यांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवलं जात नाही तसंच इथेही ते होऊ नये.
काहींनी तर म्हटलंय बायकांना रस्त्यावर गाडी चालवता येत नाही यांना काय विमान उडवता येणार? फक्त सोशल मिडियाच नव्हे तर प्रत्यक्ष जमिनीवर पण लोक अशाच गोष्टी बोलताना ऐकलं. परवा एक रिक्षावाले काका पण विचारत होते "विमान मुलगी उडवत होती ना?" एका इसमानं तर हद्द केली आहे. सरळ हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र धाडून मुलीला अजित पवारांचं विमान का चालवू दिलं? असं विचारलं आहे.
आजही आपल्या जगात मुलींच्या पोटेन्शियल वर किती शंका आहे. एकतर कुठलीही संधी मिळवण्यासाठीच एक मोठा झगडा करुन इथवर यायचं आणि मग पुरुषांनी पुरुषांसाठी बनवलेल्या जगात अडजस्ट करूनही लोकांनी जेंडर स्टिरिओटाइपिंग करुन शंका घ्यायच्या.. आणि मनोबल खचवत राहायचं.
Road accidents data ची सरकारी आकडेवारी सुद्धा म्हणते की 96% अपघातात वाहक पुरुष होते. अर्थात महिला ड्रायव्हर आधीच कमी आहेत म्हणून आकडेवारी स्क्यूड वाटू शकेल पण ज्या आहेत त्याही अपघाताच्या आकडेवारीत 3-4% च आहेत. त्यामुळे महिला वाईट ड्रायव्हर असतात हा समज करुन घ्यायला काय डेटा आहे? पुरुषांना फक्त त्यांना हवी तशी गाडी महिला चालवत नाहीत म्हणून त्या चुकीच्या वाटतात. अगदी माझ्या काकांना सुद्धा असं वाटतं की त्यांच्या मुलीला घाटात गाडी नीट जमणार नाही. आणि ते तिला घाटात गाडी चालवू देत नाहीत. स्वतः बसतात.. आता तुम्ही संधीच दिली नाही तर ती शिकणार कधी? आणि तिला स्वतःवर आणि तुम्हालाही तिच्यावर कॉन्फिडन्स येणार कधी?
अपघात झाला म्हणजे काहीतरी तांत्रिक चूक असणार, ज्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि ती होईल पण शांभवीचं नाव मिळालं नसतं तर यांनी अशाच पद्धतीने कुठल्या पुरुष वैमानिकावर अशी शंका घेतली असती का?