शरद पवारविरोधी अनंत गीते आज पवारांचे पाय धरतात, मला आनंद आहे - सुनील तटकरे

Update: 2024-04-11 12:49 GMT

रायगड(धम्मशील सावंत) :

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. भाजपने 400 पार चा नारा दिला आहे. तर महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा जिंकण्याचा दावा केलाय. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार सुनिल तटकरे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते , माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यात मुख्य लढत होत आहे.

रायगडात आरोप प्रत्यारोपासह एकमेकांवर टीकेची झोड उठत आहे. मतदारसंघात प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडत आहे. सहा वेळा केंद्रीय राजकारणात खासदार राहिलेले अनंत गीते हे तटकरेंना आव्हान ठरतील का? आजवर रायगडसह कोकणच्या विकासातील वाटा काय? तटकरे नेहमीच त्यांचे वरिष्ठ नेते सहकारी पक्ष यांच्याशी वारंवार दगाबाजी करीत असल्याचा आरोप, भाजपची लोकशाही , संविधानविरोधी भूमिका, सख्खे भाऊ अनील तटकरे विरोधकांच्या गोटात, भ्रष्टाचार घोटाळ्याचे आरोप, ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांच्या माध्यमातून होणारी विरोधकांची गळचेपी, एकेकाळी दुखावलेला शिंदे गट, भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका, फुले, शाहू आंबेडकरी, सेक्युलर विचारधारेचे काय? संविधानप्रेमी मुस्लिम, बुद्धिष्ट मतदार दुरावतील का? या प्रश्नावर सुनिल तटकरे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी खास बातचीत केली आहे.

पाच वर्षात अनंत गीतेंपेक्षा अधिक काम केले; सुनिल तटकरेंचा दावा

2024 ची लोकसभा निवडणूक ही देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची निवडणूक आहेच . परंतु महाराष्ट्रात सुद्धा आमच्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाची निवडणूक आहे. 32 रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून माझी सर्वानुमते अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पाच वर्षे पूर्वी मी देशाच्या संसदेत काम करण्याची संधी मिळाली. मी खात्रीशीर नक्कीच दावा करतो की ज्या अनंत गीतेंना अधिक काळ संसदेत संधी मिळाली , त्यांच्यापेक्षा अधिक काम, जनतेशी संवाद , संपर्क ठेवण्यात सर्वच कालावधीत यशस्वी ठरल्याने मला विश्वास वाटतोय की मतदारसंघातील जनता, महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मला सर्वाधिक मताधिक्य मिळवुन विजयी करतील असे तटकरे म्हणाले.

मतदार संघात प्रचार प्रसारात अभूतपूर्व प्रतिसाद

अलिबाग, गुहाघर, दापोली, मंडणगड, पेण, श्रीवर्धन, महाड या सहा विधानसभा मतदारसंघात अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रामुख्याने पाहिले तर या मतदारसंघात शिवसेना पक्षाचे तीन आमदार आहेत. भरत गोगावले, महेंद्र दळवी, योगेश कदम, तर भाजपचे रवींद्र पाटील यांचा समावेश आहे. शिवसेना भाजप या दोन्ही पक्षाचे जाळे संपूर्ण मतदारसंघात पसरले आहे. डॉ विनय नातू, सूर्यकांत दळवी, ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी देखील चंग बांधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि स्वतः राजकीय सामाजिक जीवनात गेली 40 वर्ष असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाळे सर्वत्र पसरले आहे. अशातच आम्ही या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत. देशाचे व्हिजन, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. माझ्या प्रचाराचा संपूर्ण मुद्दा केवळ विकासाचा मुद्दा आहे. रायगड आणि कोकणाला पुढे नेण्याच्या दृष्टीने आम्ही काय काम केले , पुढे काय काम करणार यावर भर दिला जाणार आहे. दुर्दैवाने ज्यांना जनतेने सहा वेळ लोकसभेत संधी दिली त्यांच्याकडे कोणतेच व्हिजन नसल्याने व्यक्तिगत टिकेखेरीज काही नाही असं मला वाटत, अस तटकरे म्हणाले.

नैराश्य आणि पराजय समोर दिसत असल्याने अनंत गीते टीकेची पातळी गाठतायेत

आपल्या मतदार संघातील जनता सुज्ञ आहे. अनंत गीते यांच्या भाषेचा स्थर खालावला आहे. ज्यांना दोन वेळा केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाली. नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेतृत्वाच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली. वाजपेयी सारख्या नेतृत्वाच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्या तोंडी ही भाषा येत असल्याने सहा वेळा जनतेने कोणत्या प्रकारचा लोकप्रतिनिधी लोकसभेत पाठवला याचा अनुभव जनता घेत आहे. गीते यांनी केलेले काम दाखवा म्हटल्यावर ते संताप चीड व्यक्त करीत आहेत. केवळ

नैराश्य आणि पराजय समोर दिसत असल्याने अनंत गीते टीकेची खालची पातळी गाठतायेत अशी टीका सुनिल तटकरे यांनी केली.

मागील निवडणुकीच्या यशात शेकाप आणी काँग्रेस च सहकार्य राहिलेय 

प्रचाराचे मुद्दे संपले की मग खालच्या पातळीवर टीका होते. 2019 ची निवडणूक लढवताना शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन निवडणूक लढवली. मी नेहमीच कबुली दिली आहे की मागील निवडणुकीच्या यशात शेकाप आणी काँग्रेस च सहकार्य राहिलेय . पण जो दावा केला जातो की अलिबाग विधानसभा मतदारसंघात 35 हजार मतांच्या फरकाने महेंद्र दळवी निवडून आले. मला जर मताधिक्य शेकापमुळे मिळाले असे असेल , आणि माझ्यामुळे जर शेकाप पराभूत होत असेल तर माझीच ताकत मतदारसंघात जास्त आहे. महाड विधानसभा मतदारसंघात साडे सहा हजार चे अनंत गीतेचे मताधिक्य होते, तिथे 21 हजार च्या फरकाने भरत गोगावले निवडून जातात म्हणजे माझीच ताकत जास्त आहे असं दिसते. हा दावा चुकीचा आहे, मी या मतदारसंघात प्रचाराला जाण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसाद मिळाला नाही, यश मिळाले तर त्यांच्यामुळे आणि अपयश आले तर माझ्यामुळे हे जनतेला देखील ठाऊक आहे असे तटकरे म्हणाले. जयंत पाटील 2009, 2014 ला अनंत गीते काय बोलले हे तपासावे.

शरद पवारविरोधी अनंत गीते आज पवारचरणी लीन, मला आनंद आहे-सुनिल तटकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातून खंजीर शब्द गायब होता तो शब्द अनंत गीतेंनी महाविकास आघाडीचे सरकार असताना आणला. राणीवली च्या सभेत उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी खंजीर खुपसला असल्याची टीका केली, आता तेच गीते पवार साहेबांचे पाय धरतात, मला आनंद आहे.

कोकणात मूलभूत पायाभूत, शैक्षणिक, आरोग्य सुविधा उभ्या करण्यात यश

15 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात असताना या जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, रत्नागिरी चा पालकमंत्री असताना त्या जिल्ह्यातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मला यश मिळू शकले. प्रत्येक तालुक्यात आय टी आय , आयटी आय च्या इमारती, प्रत्येक तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती, अंगणवाड्या, प्राथमिक शाळा, रस्त्यांचे जाळे , पिण्याच्या पाण्याच्या योजना पसरवण्यात मला यश आले आहे. अलीकडच्या काळात रायगड मधील मेडिकल कॉलेज, रत्नागिरी मधील मरीन इंजिनिअरिंग कॉलेज , आणण्यात यशस्वी ठरलो. किल्ला परिसरात पोस्ट हार्वेस्टिंग कॉलेज ही ठळक कामे केली. बाग मांडला वरील पूल, सागरी मार्गावरील 10 हजार कोटींच्या कामांसाठी टेंडर निघाले आहेत, त्याकामी लक्ष घातले . पळस्पे ते इंदापूर या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामात नितीन गडकरी यांच्याकडून 700 कोटी ची मंजुरी मिळवून सुरू असलेले काम हे खासदार म्हणून माझ्या कामाचे यश आहे.

धैर्यशील पाटील व कार्यकर्ते माझे काम करतील

भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी निर्णय घेतल्यांनंतर आता नाराजी संपुष्टात आली आहे, भाजप पक्ष शिस्तप्रिय पक्ष आहे. पक्षाची धोरणे , निर्णय, पक्षाचे कार्यकर्ते अंगिकारतात. पक्षाच्या निर्णयावर धैर्यशील पाटील व कार्यकर्ते सक्रिय होऊन प्रचाराच्या कामाला लागतील.


लोकशाही, संविधान धोक्यात येत असल्याचा इंडिया आघाडीचा कांगावा

शिव, फुले ,शाहू, आंबेडकरी विचारधारेचा वारसा, सिद्धांत घेऊन मागील 40 वर्ष काम करीत आलो. निवडणुका जवळ आल्या की लोकशाही धोक्यात आली, संविधान धोक्यात आले आहे असा कांगावा जाणीवपूर्वक इंडिया आघाडी विरोधकांकडून केला जातो. मागील 10 वर्ष नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची नेत्रदीपक प्रगती झाली. दहा वर्षात सत्तेत असताना कुठं संविधान बदललं. कालबद्ध पद्धतीने काही बदल होत असतो, काँग्रेसच्या काळात ही काही बदल झाल्याचे तटकरे म्हणाले.

महायुतीतील शिवसेना, भाजपने माझ्या विजयासाठी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली

महाविकास आघाडीच्या सरकारमधील शिंदे गटाचे तिन्ही आमदार यांनी बंड केले होते यावर तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत तिन्ही आमदार यांच्या समवेत बैठक झाली. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील बैठक घेऊन माझ्या प्रचाराचे आदेश देण्यात आले आहेत.

महायुतीतील शिवसेना, भाजपने माझ्या विजयासाठी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.

सख्ये भाऊ अनील तटकरे विरोधकांच्या गोटात

अनिल तटकरे यांचा यापूर्वी अनुभव घेतलाय, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणार , निवडणुकीला सामोरे जाणार आहे. 04 तारखेच्या निवडणूक निकालात खरी वस्तुस्थिती, जिल्ह्याचे चित्र समोर येईल असे तटकरे म्हणाले.

ईडी, सीबीआय, आयकर विभागावर होणारे विरोधकांचे आरोप तथ्यहीन

जगाच्या पाठीवरच्या विकसित राष्ट्रात भारताने स्थान मिळवले. अर्थव्यवस्थेत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात वाढ़ झालीय . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आजही कायम, पुढेही राहील. एन डी ए मध्ये विकासाच्या मुद्द्यावर, बहुजनांच्या हितासाठी सामील झालो आहोत. देशातील सुज्ञ जनता महायुतीला सत्ता मिळवून देईल असे तटकरे म्हणाले. ईडी, सीबीआय, आयकर विभागावर होणारे विरोधकांचे आरोप तथ्यहीन असल्याचे तटकरे म्हणाले.

इव्हीएम वर विरोधकांची पोरखेळ पद्धतीची विधाने

भाजपने 400 पार चा नारा दिला आहे. ईव्हीएम वर शंका घेतली जाते यावर तटकरे म्हणाले की निवडणूका यांच्यापैकी कोणी जिंकल्या तर आम्ही जिंकल्या, आणि पराभूत झाल्या तर ईव्हीएम मुळे अस कस होईल. यापूर्वी उबाठा चे नेते जिंकले ते ईव्हीएम मुळे जिंकले असे म्हणायचे का? असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला. इव्हीएम वर विरोधकांची पोरखेळ पद्धतीची विधाने असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.

मुस्लिम मतदार माझ्यासोबत

मी मागील चाळीस वर्षात केलेल्या विकासकामांवर जनता समाधानी आहे. मतदारसंघातील मुस्लिम बांधव माझ्यासोबत असल्याचे तटकरे म्हणाले.

Similar News