Sant Gadge Maharaj : शिकून शहाणे व्हा व समाज घडवा !
एका माणसाच्या वाट्याला आलेले दुःख, दुसर्या माणसाने समजून घेतले पाहिजे, त्यांच्या गुणअवगुणाची पारख करून, माणूसच माणसाला माणूसकित आणू शकतो. यावर गाडगे महाराजांची शिकवण अवलंबून होती. लोकशिक्षण देणाऱ्या संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त किरण सोनावणे यांचा लेख
Sant Gadge Maharaj Death Anniversary संत गाडगेबाबा महाराज, पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876साली, सेणगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे झाला. ते आपल्या आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र, ते जातीने परिट होते. त्यांच्या आईचे नाव सखुबाई वडील झिंगराजी ते दारूच्या व्यसनात अडकले होते त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गाडगेबाबांचे पुढील आयुष्य त्यांच्या मामाच्या गावी म्हणजेच दापुरे तालुका मूर्तिजापूर येथे गेले. आजोळी ते लहानपणी गुरेढोरे राखत व त्यातच त्यांना भजन कीर्तनाची गोडी लागली.
लहानपणापासून जातिभेदातील हिंसात्मक गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या, त्यामुळे त्यांचा त्यांना तिटकारा होता, मामाच्या घरीच पुढे 1891 साली, त्यांचा कुंताबाईशी विवाह झाला. त्यांना चार अपत्ये झाली, त्यातील आलोका सोडले तर बाकी सर्व लहानपणीच दगावली, पुढे 1905 पासून डेबूजीने स्वतःला लोकसेवेत वाहून घेतले. आपल्या भजन व कीर्तनातून त्यांनी तळागाळातील लोकांमध्ये, जनजागृती करायला सुरुवात केली. त्यांनी संसाराचा त्याग केला आणि ते तीर्थयात्रा करू लागले, त्यातच त्यांना समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट रूढी- परंपरा, अंधश्रद्धा पाहून समाजासाठी काहीतरी करण्याचे व्रत स्वीकारले.
गाडगेबाबांचे समाजकार्य
डेबुजींना लहानपणापासू भजन कीर्तनाची आवड होती. ते धार्मिक व परोपकारी होते. समाजसुधारणा व लोकशिक्षणासाठी त्यांनी भजन व कीर्तनाच्या मार्गातून शिकवण देण्यास सुरुवात केली, ते निरक्षर होते, परंतु त्याची वाणी ओजस्वी व सुबोध होती. ती सर्वसामान्यांच्या मनाला भीडणारी होती. त्यांचे कार्य गुजरात, कर्नाटक, आंध्र व महाराष्ट्र या राज्यातील विविध भागात पोचले होते. त्यांनी लोक जागृती करण्यास सुरुवात केली, भजन व कीर्तनातून लोकांच्या प्रश्नांना उत्तर, असा दे संवाद साधत, त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत होते.
त्यातूनच त्यांनी लोकांना, कर्ज काढून सण साजरे करू नये, चोरी करू नये, देव धर्माच्या नावाने नवस करून मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नये, आपापसातील शिवाशीव व मतभेद पाळू नये, दारू पिऊन संसाराची होळी करू नये, हुंडा देऊ नये, आपल्या आई-वडिलांची सेवा करावी, भुकेल्यास अन्न द्यावे,मुलांना शिकवून ज्ञानी बनवावे अशा प्रकारच्या अनेक शिकवणी ते आपल्या भजन कीर्तनातून देत. समाज याला चांगला प्रतिसाद देत होता. गोपाळा गोपाळा/ देवकीनंदन गोपाळा// असा गजर चे कीर्तनाच्या शेवटी करत. त्यात लोक आनंदाने गडून जात. त्यांच्या या कार्यक्रमांना लाखोंची गर्दी होत असे.
तळागाळातील ओळख
डेबूजी पुढे आपल्या कार्याने “गाडगे महाराज” या नावाने प्रसिद्ध झाले. अंगावर फाटकी गोधडी आणि हातात एक गाडगे, हातात सोटा आणि एक खराटा त्यामुळे ते “गोधडे महाराज” या नावाने सुद्धा प्रसिद्ध पावले. लोकजागृतीसाठी प्रवास करत असताना त्यांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. मुंबई येथील 8 नोव्हेंबर 1956 रोजी, वांद्रे पोलीस स्टेशन जवळ झालेले कीर्तन हे त्यांचे अखेरचे कीर्तन होय. अमरावती येथे त्यांची समाधी आहे.
लोक शिक्षण -: एका माणसाच्या वाट्याला आलेले दुःख, दुसर्या माणसाने समजून घेतले पाहिजे, त्यांच्या गुणअवगुणाची पारख करून, माणूसच माणसाला माणूसकित आणू शकतो. यावर गाडगे महाराजांची शिकवण अवलंबून होती.
अज्ञान व व्यसनाधीनता या पासून आलेले दारिद्र्य, माणसाला पुरते जेरीस आणते. यातूनच माणसाच्या वाट्याला अतीव दुःख येते. हे पाहून गाडगे महाराजांचे मन संसारात व गृहस्थजीवनात रमले नाहीत. प्रस्तावित वर्चस्ववादी, रूढी परंपरा आणि अहंकारी मानसिकता, यांचे समाजातील प्राबल्य पाहून त्यांचे मन उदास झाले. आणि त्यांनी संसारिक जीवनाचा त्याग केला. यातूनच दुर्गुणी रूढींवर प्रहार करण्यास सुरुवात केली. लोक सेवेला आपले अख्खे आयुष्य वाहून घेतले. दुःख परिहास हाच ध्यास घेऊन त्यांनी समाजसुधारणेच्या कार्याला सुरुवात केली. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा असे त्यांचे मानववादी व समाजवादी तत्त्वज्ञान आहे. देवळाच्या बाहेर बसून, माणसांकडून पाया पडून न घेता, ते त्यांची सेवा करण्यात धन्यता मानत. स्वच्छता त्यांना खूप आवडे म्हणून ते कायम स्वतः खराटा घेऊन स्वच्छता करत व लोकांना करण्यास भाग पाडत.
त्यांचा प्रामाणिकपणा व भूतदयेवर खूपच विश्वास होता. ते मंदिराबाहेर झाडलोट करत व भक्तांनी दिलेले चांगले अन्नधान्य गरीबांच वाटून टाकत, स्वतः मात्र चटणी भाकर खाऊन राहत. पाखंडीपणा, जातिभेद, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. ते कीर्तनातून शिवाशीव हा रिकाम टेकड्या व फुकट्या लोकांचा खेळ आहे असे ते सांगत. या समाजातील विषमतेची बीजे नष्ट करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. भेदाभेद मुक्त समाज हाच, खरा या देशाची ताकद आहे असे ते सांगत. भेदभावातूनच अनेक वर्षांचे स्वातंत्र्य जाऊन गुलामगिरीत आपला समाज सडतो असे ते सांगत. लोक शिक्षणातून भावी भेदाभेद मुक्त समाज घडवणे हे त्यांचे ध्येय होते. त्यांनी समाजातील ही घाण साफ करून चांगला समाज घडवणे, हेच स्वच्छतेतून दाखवून दिले.
त्यांना स्वच्छता व समानता हवी होती, माणसाचे मन परिवर्तन व मत परिवर्तन म्हणजे समाज घडवणे हा त्यांचा दृढ विश्वास होय. अध्यात्माच्या जंजाळात न अडकता संसारात राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी सरळ शिकवण त्यांनी समाजात दिली. संत तुकारामांना ते आपले गुरु मानत व कोणच आपला शिष्य नाही असे सांगत. गाडगे महाराजांवर लोकांची अपार श्रद्धा होती. यातूनच लोकांनी त्यांना विपूल पैसा दिला, परंतु त्यांनी तो लोकोपयोगी कार्यस देऊन टाकला. समाजातील अनेक शिक्षण संस्थाना त्यांनी मदत केली.
शिकून शहाणे व्हा व समाज घडवा असे त्यांचे मत. त्यांच्या संस्थानाचा कारभार विश्वस्त मंडळ चालवते. ऋणमोचन घाट मंदिर, मुर्तीजापुर गोरक्षण संस्था, पंढरपूर चोखामेळा धर्मशाळा, पंढरपूर मराठा धर्मशाळा, आनंदी परीट धर्मशाळा, नागरिक धर्मशाळा, त्र्यंबकेश्वर कलाईवला धर्मशाळा इत्यादी संस्था त्यांनी चालू केल्या. 1952साली, गाडगेबाबा मिशन ही संस्था त्यांच्या भक्तांनी चालू केली. 2005 साली अमरावती विद्यापीठाचे नाव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे करण्यात आले. असे अनमोल कार्य या योग्याने आपल्या आयुष्यभर केले. त्यांच्या कार्याला खरंच तोड नाही.
किरण सोनावणे