Faith vs Reason Discussion : गाझामध्ये मारल्या गेलेल्या चिमुकल्यांच्या मृत्यूला कोण कारणीभूत आहे? अन् त्यांना वाचवायला देव का येत नाही?

Does God Exist - जावेद अख्तर विरुद्ध मुफ्ती नादवी ह्यांच्या डिबेटमध्ये माणुसकीच्या नात्यानं कोण जिंकलं कोण हारलं? तसेच देवाच्या अस्तित्वावर आपला एक अनुभव डॉ. विजय रणदिवे शेअर करतायेत वाचा विचार करा...

Update: 2025-12-22 08:16 GMT

Prove God's existence देवाचं अस्तित्व सिद्ध करू पाहणाऱ्या किंवा देवाचे गुणविशेष (attributes) वर्णन करू पाहणाऱ्या लोकांची अवस्था खरंतर फारच दयनीय हास्यास्पद अन केविलवानी अशी असते. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणतात तसे हे त्या अदृश्य देवाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जीवाचा आकांत करत असतात जो देव ह्यांच्याही हाकेला कधी धावून आलेला नसतो. हे म्हणजे एखादा गल्लीतला छाटछूट व्यापारी आपली प्रतिष्ठा स्थापित करण्यासाठी एलॉन मस्क सारख्या मोठ्या व्यापाऱ्याशी आपलं नातं सांगत असतो तसंच आहे. Elon Musk एलॉन मस्क ह्या भाकऱ्या व्यापाऱ्याला ओळखतही नसतो , पण हा बळेच त्याला आपला "गॉडफादर" करून मिरवत असतो.

Covid कोविडमधला प्रसंग आहे. Law of Attraction लॉ ऑफ अट्रॅक्शन (आकर्षणाचा सिद्धांत) नावाची एक तद्दन फ्रॉड "टेक्निक"(?) शिकवणाऱ्या असंख्य ठगांपैकी एक मराठमोळा ठग झूम वर ऑनलाईन सेमिनार्स घेत होता. मला एका मैत्रिणीने त्या मीटिंगची लिंक पाठवली. गंमत म्हणून मी जॉईन झालो. व्हिजुअलाईज करा .. फील करा.. प्रार्थना करा.. अन धन्यवाद व्यक्त करा .. म्हणजे एक दिवस ते प्रत्यक्ष्य मॅनिफेस्ट होईलच .. अश्या त्याच-त्या रटाळवाण्या खोट्या थापा मारत त्या स्पिकरने पाऊण तास ज्ञान हेपललं. नंतर प्रश्नोत्तराचा राउंड होता. मी प्रश्न केला, सर तुम्ही म्हणता आपले विचार आणि आपल्या प्रार्थना जश्या असतात तश्याच गोष्टी आपल्यासोबत घडत असतात , आपण कळत नकळत जे मागत असतो तेच हे विश्व (किंवा परमात्मा) आपल्याला पुरवत असतो. तर मला सांगा एखाद्या तीन वर्षाच्या मुलीवर एक नराधम बलात्कार करतो त्याला त्या चिमुकल्या निरागस मुलीचे असे कोणते विचार किंवा कर्म कारणीभूत असतात ?

माझ्या ह्या भावनिक प्रश्नावर तो काहीतरी संवेदनशील उत्तर देईल हे अपेक्षित होतं , परंतु तो जे काही बोलला ते ऐकून माझ्या डोक्यात संतापाची सनक शिरली. तो बोलला, ती वयाने लहान जरी असली तरी तिचे मागच्या जन्मातले काही कर्म असतील ज्यामुळे ह्या जन्मात तिच्या आयुष्यात हि घटना आकर्षित झाली. ते ऐकून मी त्या हरामखोराला घाण घाण शिवीगाळ करायला सुरवात केली, हि ऑनलाईन मिटिंग नसती अन आता जर तू माझ्या पुढं प्रत्यक्षात असता तर तुला कुत्र्यासारखा तुडवला असता . हे ऐकून तो आणि मीटिंगमधले इतर लोक जरा चरकले. तुम्ही असं कसं बोलतायत म्हणून त्यांनी मला मीटिंगबाहेर हाकलून देण्याची धमकी दिली. मी म्हटलं साहेब चिडता कशाला ? मी जर तुम्हाला तुडवलं तर तेसुद्धा आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्याच प्रार्थनेचे किंवा विचारांचे किंवा कर्माचे फळ नसेल का? सर्वात भयानक म्हणजे तिथं मिटिंगमध्ये उपस्थित असलेले एक दोन जण वगळता माझ्या बाजूने बोलायला एकही जण धजावत नव्हता. ज्या मैत्रिणीने मला इन्व्हाईट केलेलं होतं तीसुद्धा माझी बाजू घ्यायला घाबरत होती, उलट मलाच पर्सनल मेसेज करून प्लिज शांत व्हा काहीबाही विचारू नका सिन क्रिएट करू नका असे सल्ले देत होती. ते पाहून मी तिच्यावरही चिडलो. तू एक स्त्री असून एका चिमुकल्या निष्पाप मुलीशी घडलेल्या गंभीर अपराधाच्या स्पिरिच्युअल जस्टिफिकेशनला समर्थन देत आहेस? मी तिचीही कानउघाडणी केली. अश्या नीच हरामी अपराधी वृत्तीलाही अध्यात्मिक मुलामा चढवून ते अपराधी कृत्य कसे न्यायसंगतच आहे हे ओढूनताणून सिद्ध करू पाहणाऱ्या हरामखोरांशी कसली चर्चा करणार? अन काय त्यांचं प्रबोधन घडवून आणणार? आपल्याच डोक्याला शॉट बसतो.

कालच्या जावेद अख्तर विरुद्ध मुफ्ती नादवी ह्यांच्या डिबेटमध्येही हेच झालं. गाझामध्ये मारल्या गेलेल्या चिमुकल्यांना मिळालेल्या भयावह निर्मम मृत्यूला कोण कारणीभूत आहे? अन त्यांना वाचवायला देव का येत नाही? असा भावनिक परंतु तर्कशुद्ध प्रश्न विचारला असता मुफ्तीच्या चेहऱ्यावर किंवा त्याच्या आवाजात जराशीही कणव झळकतांना दिसली नाही. तो तिथंच डिबेट हरला होता. पण हार स्वीकार करेल तो धार्मिक कसला ? तो एका प्री-प्रोग्रॅम्ड रोबोटसारखा जी उत्तरं देत होता त्यात काही जणांना विद्वत्ता दिसली असली तरी त्यात ती "करुणा" मिसिंग होती जी शिकवण्याचा दावा त्याचा आणि प्रत्येकाचा धर्म करत असतो. तो प्रश्न विचारतांना जावेद साहेबांच्या आवाजात माणुसकी करूणा आणि अन्यायाविरुद्ध असलेला वैताग चिडचिड स्पष्ट जाणवत होती. ती मुफ्ती साहेबाच्या उत्तरात अनुपस्थित होती. हाच फरक असतो एका विवेकवादी आणि धार्मिक व्यक्तीत.

गाझामध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या लाखो चिमुकल्यांना मृत्युपश्चात न्याय मिळेल हि आशा मुफ्ती साहेब दाखवताना दिसलेत. अर्थातच ती आशा त्यांना त्यांच्या धर्माने सोपवली आहे. मृत्यूनंतर न्याय किंवा नुकसानभरपाई मिळते हि आशा धर्म सोपवतो. ह्या आशेतूनच स्वर्गाची कल्पना जन्म घेते. अन स्वर्गाच्या ह्या कल्पनेतूनच आतंकवादासारख्या अमानवी प्रवृत्ती जन्माला आल्या आहेत ह्या गोष्टीचा आस्तिकांना विसर पडलेला दिसतोय.

डॉ. विजय रणदिवे

Similar News