दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना का भडकवले ? ; हायकोर्टानं 'हिंदूस्तानी भाऊ'ला फटकारले

Update: 2022-03-15 08:20 GMT

``तुम्ही विद्यार्थ्यांना का भडकवले ? असा सवाल करत विद्यार्थ्यांना मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचे आवाहन करणे अत्यंत चुकीचे आहे, अशा शब्दांत हायकोर्टानं विकास पाठक उर्फ 'हिंदूुस्तानी भाऊ'ला फटकारले आहे. दहावी व बारावीच्या प्रत्यक्ष परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी भडकावल्याचा आरोप पाठकवर आहे.

या प्रकरणी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिशीविरोधात पाठकने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

त्यावेळी पाठकच्या वकिलांनी खंडपीठाला प्रकरणाची माहिती दिली. तसेच पाठकला अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली. त्यावर याचिकाकर्त्यांने विद्यार्थ्यांना का भडकवले. विद्यार्थ्यांना मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचे आवाहन करणे चुकीचे आहे. पाठकने विद्यार्थ्यांना समाजमाध्यमाद्वारे एकत्र येण्यास सांगितले. हे तरुण दहावी व बारावीचे विद्यार्थी असून त्यांना समाजमाध्यमाच्या सहाय्याने सहजपणे प्रभावित केले जाऊ शकते, अशा शब्दांत न्यायालयाने पाठकच्या कृतीवर ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान, नोटिशीनुसार, पाठक हा दंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाला आणि त्याच्याकडून सार्वजनिक शांतता भंगांची शक्यता नाही याची खात्री पटली. तर भविष्यात अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा केला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र त्याच्याकडून लिहून घेण्यात येईल. त्यामुळे त्याची याचिका दखल घेण्यायोग्य नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने विशेष कार्यकारी दंडाधिकारम्यांना तूर्त नोटिशीवर अंतिम निर्णय न देण्याचे आदेश कोर्टानं दिला आहे.

Tags:    

Similar News