पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची संधी!
३१ डिसेंबर २०२५ नंतर मोजावे लागतील जास्त पैसे
तुम्ही अजूनही तुमचे पॅन कार्ड (PAN) आधार कार्डशी (Aadhaar) लिंक केले नसेल, तर आता तुमच्याकडे फार कमी वेळ उरला आहे. पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ आहे.
विशेषतः ज्यांनी १ ऑक्टोबर २०२४ पूर्वी 'आधार एनरोलमेंट आयडी' (Aadhaar Enrolment ID) वापरून पॅन कार्ड काढले आहे, त्यांच्यासाठी ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे.
जर तुम्ही या तारखेपर्यंत हे दोन्ही दस्तावेज लिंक केले नाहीत, तर तुमचे पॅन कार्ड 'निष्क्रिय' (Inoperative) होईल. याचा थेट फटका तुमच्या खिशाला आणि गुंतवणुकीला बसू शकतो.
पॅन-आधार लिंक न केल्यास काय होईल?
जर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले, तर तुम्हाला खालील आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो
१. टॅक्स रिफंड अडकेल: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना अडचण येईलच, पण तुमचा कोणताही टॅक्स रिफंड (Tax Refund) मिळणार नाही
. २. रिफंडवर व्याज नाही: जर तुमचा काही परतावा (Refund) थकलेला असेल, तर त्या कालावधीसाठी त्यावर कोणतेही व्याज मिळणार नाही.
३. दुप्पट टॅक्स कपात: तुमचा टॅक्स (TDS/TCS) जास्त दराने कापला जाईल. जिथे १०% कपात होते, तिथे २०% पर्यंत कपात होऊ शकते.
४. फॉर्म 26AS मध्ये तफावत: तुमचे कापलेले टॅक्स क्रेडिट फॉर्म 26AS मध्ये दिसणार नाही आणि त्याचे सर्टिफिकेटही मिळणार नाही.
५. 15G/15H फॉर्म रद्द: ज्यांना टॅक्स वाचवण्यासाठी 15G किंवा 15H फॉर्म भरायचा आहे, त्यांना पॅन कार्ड निष्क्रिय असल्याने तो भरता येणार नाही.
बँकिंग व्यवहार करणे होईल कठीण
पॅन कार्ड हे केवळ टॅक्ससाठी नाही, तर बँकिंगसाठीही महत्त्वाचे आहे. ते लिंक नसल्यास खालील व्यवहार करता येणार नाहीत:
नवीन बँक खाते उघडणे.
डेबिट किंवा क्रेडिट कार्ड मिळवणे.
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे.
बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एका दिवसात ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा करणे.
५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचा बँक ड्राफ्ट (DD) किंवा पे-ऑर्डर काढणे.
१०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कोणतेही बँक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात.
सरकारी सेवा आणि नवीन पॅन कार्ड
पासपोर्ट काढणे, सरकारी सबसिडी मिळवणे किंवा बँक खाते उघडणे यांसारख्या सरकारी सेवांसाठी पॅन आणि आधार दोन्ही लागतात. जर हे लिंक नसतील, तर तुम्हाला या सेवांपासून वंचित राहावे लागेल. तसेच, जर तुमचे जुने पॅन कार्ड हरवले किंवा खराब झाले, तर नवीन पॅन कार्ड मिळवणे कठीण होईल, कारण त्यासाठी आधार क्रमांक देणे अनिवार्य आहे.
पॅन कार्ड पुन्हा सुरू (Active) करायचे असल्यास काय करावे?
जर ३१ डिसेंबर २०२५ नंतर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले, तर ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला १००० रुपये दंड भरावा लागेल. दंड भरल्यानंतर आणि आधार लिंक केल्याची विनंती केल्यानंतर ३० दिवसांनी तुमचे पॅन कार्ड पुन्हा चालू होईल.
ज्यांनी १ ऑक्टोबर २०२४ नंतर आधार एनरोलमेंट आयडी वापरून पॅन कार्ड काढले आहे, ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत विनामूल्य पॅन-आधार लिंक करू शकतात.
पॅन-आधार लिंक कसे करावे?
तुम्ही घरबसल्या सहजपणे हे काम करू शकता:
इन्कम टॅक्सच्या ई-फाईलिंग पोर्टलवर (e-filling portal) जा.
तिथे होम पेजवर 'Quick Link Aadhaar' हा पर्याय निवडा.
लॉग-इन न करताही तुम्ही तिथे तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाकून ते लिंक करू शकता.
ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांची आहे, त्यामुळे ३१ डिसेंबरची वाट न पाहता आजच तुमचे पॅन आणि आधार लिंक करून घ्या आणि होणारा मनस्ताप टाळा.