Beed | नगरसेवक निवडणुकीनंतर दहशत, कोयता फिरवत धमकी
तुझी भावजय नगरसेवक पदी निवडुन कशी काय आली? असे म्हणत कोयता फिरवत दहशत.
बीड - नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर संत नामदेवनगर परिसरात दहशतीची घटना घडली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आरती बनसोडे या नगरसेवक पदी निवडून आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने कोयता घेऊन गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कौशल्य मस्के याने आरती बनसोडे यांचे दीर अजिंक्य बनसोडे यांच्या घरासमोर धारदार कोयता घेऊन जाऊन, “तुझी भावजय नगरसेवक पदी निवडून कशी काय आली?” असा जाब विचारला. यानंतर आरोपीने कोयता मिरवत दोन दुचाकींची तोडफोड केली आणि परिसरात दहशत निर्माण केली.
इतकेच नव्हे तर कोयता फिरवत मोठ्या आवाजात ओरडून जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचे समोर आले आहे. संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.