Panjab election : पंजाबसाठी कोण असणार आपचा चेहरा?, भगवंतांना मान मिळणार का?

देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणूका जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात आम आदमी पक्षाने उमेदवारांची 10 वी यादी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे. तर आता पंजाबसाठी आम आदमी पक्ष कोणता चेहरा पुढे करणार याची घोषणा आज करण्या येणार आहे.

Update: 2022-01-18 03:28 GMT

पंजाब विधानसभेचे वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. तर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच भाजप आणि काँग्रेस निवडणूकीनंतर आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित करणार आहेत. त्यामुळे प्रचारात वेग आणण्यासाठी आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाबचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार आहेत.

आम आदमी पक्षाने उमेदवाराची 10 वी यादी जाहीर केली. मात्र अजूनही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यात आला नाही. तर पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी आम आदमी पक्षाने लोकांना त्यांचे मत विचारले होते. त्यानंतर मंगळवारी दुपारी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार आहेत.

पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी अरविंद केजरीवाल यांनी कंबर कसली आहे. तर पंजाबमध्ये लोकप्रिय असलेले भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर भगवंत मान यांना लोकांचा पाठींबा असला तरी काही प्रमाणात पक्षांतर्गत विरोध आहे. त्यामुळे दुपारी 12 वा आम आदमी पक्षाचा पंजाबसाठी कोण असणार चेहरा हे निश्चित होणार आहे.

भगवंत मान यांचे मालवा भागात मोठे वर्चस्व आहे. तर भगवंत मान हे संगरूर लोकसभा क्षेत्रातून दोन वेळा लोकसभेचे सदस्य होते. त्यामुळे भगवंत मान यांचा चेहरा पुढे केला जाऊ शकतो, असा दावा सुत्रांनी केला आहे.

पंजाब विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. मात्र गुरू रविदास यांची जयंती असल्याने लोक मतदानाकडे पाठ फिरवतील अशी शक्यता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर निवडणूक 20 फेब्रुवारी रोजी घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे,

Tags:    

Similar News