ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ हिंदी साहित्यकार विनोद कुमार शुक्ल यांचे निधन
मगर मैं स्वभाविक मौत तक ज़िंदा रहना चाहता हूं, दूसरों के मारने तक नहीं : विनोद कुमार शुक्ल
मगर मैं स्वभाविक मौत तक ज़िंदा रहना चाहता हूं, दूसरों के मारने तक नहीं : विनोद कुमार शुक्ल
Vinod Kumar Shukla passes away हिंदी साहित्याचे आधारस्तंभ आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रख्यात कवी, कथाकार, कांदबरीकार विनोद कुमार शुक्ल यांचे मंगळवारी (२३ डिसेंबर २०२५५) संध्याकाळी रायपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) मध्ये निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. दीर्घकाळ आजारी असलेल्या शुक्ल यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे २ डिसेंबर रोजी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. व्हेंटिलेटरवर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी संध्याकाळी ४:५८ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कोण होते विनोद कुमार शुक्ल?
विनोद कुमार शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी छत्तीसगढातील राजनांदगाव येथे झाला. ते छत्तीसगढचे पहिले साहित्यकार होते ज्यांना भारताचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार (५९वा, २०२४) मिळाला. त्यांच्या रचना साधेपणा, मानवी संवेदना आणि दैनंदिन जीवनाच्या गहन चित्रणासाठी ओळखल्या जातात. प्रमुख कृतींमध्ये कांदबरी'नौकर की कमीज' (ज्यावर मानव कौल यांनी चित्रपट बनवला), 'दीवार में एक खिड़की रहती थी' (साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त), 'खिलेगा तो देखेंगे' तसेच कविता संग्रह 'लगभग जयहिंद', 'कविता से लंबी कविता' इत्यादींचा समावेश आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. मोदींनी एक्सवर लिहिले, "ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रख्यात लेखक विनोद कुमार शुक्ल जी यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. हिंदी साहित्य जगतात त्यांच्या अमूल्य योगदानासाठी ते नेहमी स्मरणात राहतील. शोकाच्या या वेळी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना आहेत. ओम शांती."
छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनीही दुःख व्यक्त केले असून ही न भरून निघणारी हानी असल्याचे सांगितले आणि राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची त्यांनी घोषणा केली. साहित्य जगतात शोकाची लाट उसळली आहे. शुक्ल यांच्या रचना येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.