ब्रेक दे चेन : आणखी काही सेवांचा अत्यावश्यक गटात समावेश

राज्य सरकारने राज्यात लावलेले कडक निर्बंध आणि वीकेण्ड लॉकडाऊन याचा फटका अनेक उद्योगांना बसतोय. पण आता यामध्ये आणखी काही बाबींचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Update: 2021-04-09 01:23 GMT

राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध जारी केले आहेत. पण यामधून अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. आता यामध्ये पशुसंवर्धनाशी संबंधित दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे, जनावरांचा चारा या बाबींचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

अत्यावश्यक सेवांमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ (डेअरी) आणि फुड शॉपचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चिकन, कोंबड्या, मटन, अंडी, मासे दुकानांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जनावरांसाठी आवश्यक असणारे पशु व कुक्कुट खाद्य, चारा यांचाही समावेश करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये स्थानिक कार्यालयांच्या मान्सूनपूर्व उपक्रमांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठीच्या अभियान काळात हाती घ्यावयाच्या लसीकरण कार्यक्रमांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवांमध्ये स्थानिक कार्यालयाच्या मार्फत जनसामान्यांना पुरविण्यात येणा-या सेवांचा समावेश असेल. यात पशुसंवर्धन विभागाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांचा समावेश होतो. तसेच सर्व प्रकारच्या कार्गो सेवांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये आवश्यक वस्तू व सेवांकरिता वाहतूक व पुरवठा (Supply Chain) अबाधित ठेवण्यात आली आहे. यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे व जनावरांचा चारा व त्यांच्यावर प्रक्रीया करण्यासाठी लागणा-या कच्च्या मालाची वाहतूक करणे व त्यांच्या साठवणूकीसाठी गोदामे चालविणे या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

Similar News