अदानी इलेक्ट्रिसिटी मीटर: सोसायट्यांवर खर्चाचा नवा भुर्दंड

प्रसाद वेदपाठकांनी केला ऑडिओ रेकॉर्डिंगचा दावा

Update: 2025-12-29 14:32 GMT

मुंबईत अनेक ठिकाणी अदानी इलेक्ट्रीसीटीद्वारे मीटर बदलण्याचं काम सुरू आहे, मात्र या मीटर बदलामुळे गृहनिर्माण सोसायट्यांना अतिरिक्त भुर्दंड पडला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी एका ट्वीटद्वारे या बाबीकडे लक्ष वेधलं आहे. मीटर बदलताना त्यामागचा बोर्ड ही बदलावा लागत असल्याने इलेक्ट्रिकल कंत्राटदारांना लाखो रुपये द्यावे लागत आहेत.

मीटर बदलताना गृहनिर्माण संस्थांवर अतिरिक्त खर्चाची सक्ती केली जात असल्याचा आरोप प्रसाद वेदपाठक यांनी केला आहे. मीटर बदलताना MCB आणि प्लायवूड बोर्ड बदलण्यासाठी सोसायट्यांना खर्च करायला लावले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक अपग्रेडचा खर्च नागरिकांवरच का टाकला जातो, असा सवाल त्यांनी केला आहे. X या समाजमाध्यमावर प्रसाद वेदपाठक यांनी पोस्ट करून अदानी इलेक्ट्रिसीटी वर टीका केली आहे.

या तक्रारीवर आदानी इलेक्ट्रिसिटीने प्रतिक्रिया देत, प्रकरण संबंधित विभागाकडे पाठवले असून लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, अदानी इलेक्ट्रीसीटी यांच्या ट्वीट वर उत्तर देताना प्रसाद वेदपाठक यांनी आपल्याकडे इलेक्ट्रीकल टेक्निशीयन राहुल पाटील नावाच्या व्यक्तीची ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला आहे. या ऑडिओमध्ये नवीन मीटरसाठी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचा खर्च सोसायटीने करावा लागतो, असे सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणामुळे वीज मीटर बदलाच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. वीज कायद्याप्रमाणे सोसायटीच्या मीटर पर्यंतचा खर्च वीज कंपनीने करायचा असतो, मीटर ते घर किंवा व्यावसायिक परिसराचा खर्च ग्राहकाने करायचा असतो, मात्र मीटर बदलत असताना त्यासाठी लागणारा बोर्डचा खर्च कुणी करायचा यावर आता वाद निर्माण झाला आहे. मीटर बदलताना होणारा हा अतिरिक्त खर्च हा इलेक्ट्रीकल कंत्राटदारांच्या संगनमताने सोसायट्यांवर लादला जात असल्याचा आरोप आहे. एकूणच अदानींचा मीटर लोकांना महागात पडत आहे. वेदपाठक यांच्या तक्रारीबाबत अद्याप अदानी इलेक्ट्रीसीटीने पुढील माहिती कळवलेली नाही.

Tags:    

Similar News