Bhandup Bus Accident भांडूपमध्ये बेस्ट बसचा थरार; रिव्हर्स घेताना नियंत्रण सुटले, ४ जण ठार, ९ जखमी
Mumbai मुंबईतील भांडूप (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर Bhandup Bus Accident (२९ डिसेंबर २०२५) सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. BEST बस रिव्हर्स घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. अपघाताच्या वेळी स्टेशन रोडवर मोठी गर्दी होती, ज्यामुळे बसने थेट पादचाऱ्यांना धडक दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. बेस्टची मिडी बस (ओलेक्ट्रा कंपनीची वेट लीज बस) रूटच्या शेवटी रिव्हर्स घेत असताना अचानक वेगात मागे सरकली आणि रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडले. मृतांमध्ये तीन महिला आणि एक पुरुष असल्याचे सांगितले जात आहे. जखमींना तातडीने राजावाडी रुग्णालय आणि इतर जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर रॅश ड्रायव्हिंग आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासात बसच्या ब्रेक किंवा मेकॅनिकल फेल्युअरची शक्यता तपासली जात आहे, परंतु मानवी चूक असण्याची शक्यता जास्त असल्याचं पोलिसांचे म्हणणं आहे.
हा अपघात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कुर्ला येथे घडलेल्या बेस्ट बस अपघाताची आठवण करून देणारा आहे. कुर्ल्यात बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने नियंत्रण सुटून अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिली होती, ज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता आणि ४० हून अधिक जण जखमी झाले होते. त्या अपघातानंतर बेस्टच्या इलेक्ट्रिक बसांच्या सुरक्षेचा आणि चालकांच्या प्रशिक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला होता.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलेल, असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 29, 2025
या घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये…
काँग्रेस नेत्यांनी अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी कुर्ल्या नंतर भांडुपचा अपघात हा देखील बेजबाबदार प्रशासनाचाच परिणाम आहे. आज झालेला अपघात हा तांत्रिक बिघाड असो किंवा मानवी चूक, खरा प्रश्न हा आहे की, BEST च्या अपघातांमध्ये इतकी भयानक वाढ का झाली आहे? याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे असंवेदनशील प्रशासन! अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
BEST च्या अपघातात आणखी चार निष्पाप जीव गेले,मुंबईकरांनो आता तरी जागे व्हा!
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 29, 2025
भ्रष्ट भाजप सरकार मुंबईकरांच्या जीवाशी खेळणे कधी थांबवणार? अजून किती बळी गेल्यावर सरकारला जाग येईल?
कुर्ल्या नंतर भांडुपचा अपघात हा देखील बेजबाबदार प्रशासनाचाच परिणाम आहे. आज झालेला अपघात हा तांत्रिक… https://t.co/ybqOeZevZo
बेस्ट प्रशासनाने अपघाताची अंतर्गत चौकशी सुरू केली असून बसचालकाला निलंबित करण्यात आले आहे. मुंबईतील गर्दीच्या रस्त्यांवर बस फिरवताना अधिक सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा अपघात मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा प्रकाश टाकणारा आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि बस चालकांच्या योग्य प्रशिक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.