समीर वानखेडे यांच्याविरोधात चैत्यभूमीवर घोषणाबाजी का झाली?

Update: 2021-12-06 09:23 GMT

NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. समीर वानखेडे यांनी सोमवारी सकाळी चैत्यभूमीवर येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. पण यानंतर समीर वानखेडे यांच्या विरोधात तिथे उपस्थित असलेल्या काही अनुयायांनी घोषणाबाजी केली. समीर वानखेडे यांना आताच बाबासाहेबांची आठवण का झाली, असा सवाल या अनुयायांनी विचारला. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या समर्थकांचा या घोषणा देणाऱ्यांशी वादही झाला.

आर्यन खानवरील कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी वारंवार समीर वानखेडे यांच्या विरोधात पुरावे देऊन गंभीर आरोप केले. यामध्ये समीर वानखेडे यांनी मुस्लिम असूनही मागासवर्गीय असल्याचे प्रमाणपत्र मिळवले आणि त्याद्वारे सरकारी नोकरी मिळवली असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. या आरोपानंतर समीर वानखेडे, त्यांचे कुटुंबीय विरुद्ध नवाब मलिक असा संघर्ष कोर्टात आहे. त्यामुळे घोषणाबाजीवर समीर वानखेडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण आपण बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलो होतो, असे वानखेडे यांनी स्पष्ट केले. तर आठवले गटातील समर्थकांनी सांगितले की केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समीर वानखेडे यांचे समर्थन केले आहे, तसेच वानखेडे यांच्यासारख्या एका मागासवर्गीय अधिकाऱ्याला विनाकारण लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करत त्यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले.

Tags:    

Similar News