पाणी प्रश्नावरुन महापालिका आयुक्तांच्या केबिनबाहेर ठिय्या, अधिकाऱ्यांची तारांबळ

Update: 2021-10-18 13:52 GMT

ठाणे  : मागील काही दिवसापासून ठाण्यासह शहराच्या इतर भागांना पाण्यासाठी वनवण करावी लागत आहे. त्यातल्या त्यात कळवा, मुंब्य्रातील नागरीकांचे पाण्यासाठी हाल सुरु आहेत. अधून- मधून जे पाणी येत आहे, ते देखील गढूळ स्वरुपात येत आहे. त्यामुळे कळवा, मुंब्य्रातील नागरीकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सोमवारी विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. तब्बल दोन तास चाललेल्या आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिलेल्या आश्वासनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

सध्या एमआयडीसीच्या वतीने जुन्या जलवाहीन्या बदलण्याचे काम सुरु आहे. परंतु ते सुरु असतांना वारंवार जलवाहीनी फुटत असल्याने त्याचा परिणाम कळवा, मुंब्य्रातील नागरीकांना सहन करावा लागत आहे. या भागात पाण्याची समस्या तीव्र स्वरुपाची झाली आहे. याच मुद्यावरुन राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील पाणी पुरवठा सुरळीत केली नाही तर महापालिकेकडे बघावे लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतरही या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत झाला नसल्याचेच दिसून आले आहे.

दरम्यान , विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी सोमवारी दुपारी १ वाजता महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत पाण्याच्या समस्येवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

पाण्याची समस्या असतांना मुंब्य्रात जे पाणी सोडले जात आहे, ते देखील गढूळ स्वरुपात येत असल्याने तेच गढूळ पाणी घेऊन त्यांनी ठिय्या आंदोलन केले. अखेर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची मनधरणी केली. त्यानुसार पाण्याचा प्रेशर वाढविण्याबरोबर येथील टाकीच्या समस्या सोडविली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.

Tags:    

Similar News