आता सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब, शिवसेनेच्या वजनदार मंत्र्यावर गंभीर आरोप

परमबीर यांच्या लेटर बॉम्बने अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारची आणखी एक मोठी कोंडी झाली आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर आता शिवसेनेच्या एका मंत्र्यांचेही नाव सचिन वाझेने पत्रात घेतले आहे.

Update: 2021-04-07 13:46 GMT

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी आता NIAला पत्र लिहून मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलीस दलात आपल्या पुर्ननियुक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता एवढेच नाहीतर ते आपल्याला तिथून काढू देखील इच्छीत होते, पण त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केला आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यावर गंभीर आरोप

याप्रकरणात आता राष्ट्रवादीनंतर शिवसेनेच्याही एका वजनदार मंत्र्यांचे नाव आले आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनीही आपल्याला कंत्राटदारांकडून वसुली करण्याचे आदेश दिले होते. असा आरोप वाझे यांनी केला आहे.

वाझे सध्या NIAच्या कोठडीत असलेल्या वाझे यांनी एक पत्र लिहिलं आहे. ज्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे.

वाझे यांनी स्वतः NIAला पत्र लिहिलं आहे. २०२० मध्ये आपल्याला पोलिस दलात घेण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. पण शरद पवारांचं मतपरिवर्तन करू, त्याचबरोबर गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती करू, असं आश्वासन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला नागपूरमधून फोनवर सांगितलं होतं. पण या कामासाठी देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती असा आरोप वाझेने पत्रात केला आहे.

परमबीर सिंग यांच्या आऱोपांची पुष्टी?

गेल्यावर्षी अनिल देशमुख यांनी आपल्याला सह्याद्री अतिथीगृहावर बोलावून शहरातील १ हजार ६५० रेस्टॉरंट आणि बारचालकांकडून वसूली करण्येच आदेश दिले. त्यावेळी हे आपल्याला शक्य नाही असे आपण सांगितले होते, असे वाझेने म्हटले आहे. त्याआधी गेल्या जुलै-ऑगस्ट मध्ये अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांआधी आपल्याला बोलावले होते. SBUTबद्दलच्या तक्रारीची चौकशी थांबवण्यासाठी परब यांनी ५० कोटी रुपये मागितले होते, असाही आरोप वाझेने केला आहे. तसेच अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या यादीतील काही ठेकेदारांची चौकशी करण्यास सांगितले, आणि ५० ठेकेदारांकडून २ कोटी रुपये वसूल करण्यास त्यांनी सांगितलं होते.

एकूणच या पत्रातून शरद पवार यांचा वाझेच्या नियुक्तीला विरोध होता हे स्पष्ट झाले आहे. तर त्याने पत्रात मुख्यमंत्र्यांचे नाव घेतलेले नाही. पण या पत्रामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.

Similar News