गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar') यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाली आहे. त्यांना सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या हवाल्याने दिले आहे. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती, तसेच त्यांना न्युमोनिया देखील झाला होता. पण ३० जानेवारी रोजी त्या कोरोनामुक्त झाल्या होत्या. तसेच त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा देखील झाली होती. त्यांना व्हेंटिलेटरचीही गरज पडत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
पण शनिवारी अचानक पुन्हा त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला आहे. "लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. त्या सध्या आयसीयूमध्य आहेत आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत"अशी माहिती डॉ. प्रतीत सामदनी यांनी दिली असल्याची माहिती या वृत्तामध्ये देण्यात आली आहे.