Manikrao Kokate |लीलावती रुग्णालयात दाखल, कोकाटेंवर आज अँजिओग्राफी, वैद्यकीय अहवालानंतर अटकेची कारवाई

Update: 2025-12-19 05:36 GMT

मुंबई- माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईबाबतची अपडेट समोर आली आहे. नाशिक पोलिसांचे पथक अटक वॉरंट घेऊन मुंबईतील लीलावती रुग्णालयात पोहोचले आहे. कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्या अटकेबाबतची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यावर आली आहे.

माहितीनुसार, नाशिक पोलिसांचे पथक काल (गुरुवार) रात्री मुंबईत दाखल झाले. सर्वप्रथम हे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचले, जिथे आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पथक थेट लीलावती रुग्णालयाकडे रवाना झाले. सध्या पोलिस रुग्णालयात उपस्थित असून पुढील कारवाईबाबत तयारी सुरू आहे.

दरम्यान, कारवाईपूर्वी कोकाटे यांची सध्याची वैद्यकीय स्थिती तपासणे पोलिसांसाठी अनिवार्य आहे. त्यामुळे नाशिक पोलीस रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणार आहेत. कोकाटेंची प्रकृती, उपचारांची गरज आणि आरोग्याचा धोका लक्षात घेऊनच अटकेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

आज कोकाटेंवर अँजिओग्राफी -

आज माणिकराव कोकाटेंवर अँजिओग्राफी करण्यात येणार असून कोरोनरी अँजिओप्लास्टी चाचणीही होणार आहे. हृदयाशी संबंधित उपचार सुरू असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच वैद्यकीय कारणांमुळे कोकाटेंची तात्काळ अटक होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.

माहितीनुसार, तज्ज्ञ डॉक्टरांच्या अहवालानुसार थेट अटक शक्य नसेल तर अटक वॉरंट रुग्णालयातच बजावले जाऊ शकते. अशा परिस्थितीत कोकाटे यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल.

माणिकराव कोकाटेंचा अखेर मंत्रिपदाचा राजीनामा

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोट्यातील सदनिका लाटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कोकाटे सध्या राज्याचे क्रीडामंत्री होते. या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी कृषीमंत्रीपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या कोकाटेंना दुसऱ्यांदा वादात सापडावे लागले. न्यायालयाच्या शिक्षेनंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत होती.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे राजीनामा अटळ

सूत्रांच्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार फारसे इच्छुक नव्हते. उच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत वाट पाहावी, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलंकित नेत्याला मंत्रिमंडळात ठेवण्यास स्पष्ट विरोध दर्शवला. मुख्यमंत्री कठोर भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर कोकाटेंचा राजीनामा स्वीकारण्यात आला.

या राजीनाम्यामुळे राज्य मंत्रिमंडळातील एक महत्त्वाची जागा रिक्त झाली असून, नव्या मंत्र्याच्या नियुक्तीबाबत आता तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि महायुतीच्या राजकारणावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News