शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी भाग्यश्री बानाईत-धिवरे

Update: 2021-09-02 07:31 GMT

शिर्डी : जगाभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे त्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. कान्हुराज बगाटे यांच्या जागी आता भाग्यश्री बानाईत-धिवरे या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी काम पाहणार आहेत. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक समजल्या जाणाऱ्या शिर्डी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद हे फार महत्त्वाचे समजले जाते. कान्हुराज बगाटे हे या देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. बगाटे यांच्यावर विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी आरोप केले होते. त्यामुळे त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली. मंदिराच्या सीसीटीव्ही फुटेजचा गैरवापर करत समितीच्या अध्यक्ष व सदस्य यांच्याविरुद्ध कटकारस्थान व बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते.

कान्हुराज बगाटे हे साईबाबा संस्थान समितीला सुरळीत काम करण्यास आडकाठी आणतं असल्याचा अहवाल वेळोवेळी उच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता. तसेच त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती नियमाला धरून नसल्यामुळे सनदी IAS अधिकारी नेमावा अशी मागणी होत होती.

दरम्यान आता संस्थांच्या सीईओ पदाची जबाबदारी भाग्यश्री बानाईत-धिवरे यांच्याकडे सोपवण्यात आल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News