कोकण किनारपट्टीत रेडअलर्ट जारी

रायगडामध्ये अतिवृष्टीचा कहर झाला असून श्रीवर्धन मध्ये दरड कोसळली असून जिल्ह्यात 1250 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

Update: 2021-06-10 04:33 GMT

राज्यात दोन दिवसांपासून मान्सून दाखल झाल्यानंतर सर्वत्र तडाखा देण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तविल्या प्रमाणे पुढील दोन दिवस कोकणात ढगफुटी प्रमाणे पाऊस असणार आहे. जिल्ह्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी खबरदारीचा आदेश दिला आहे. आज दिवसभर जिल्ह्यात पावसाची जोर कायम होता. अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन येथे दरड कोसळली. तर, अलिबाग येथील एक मच्छीमार दिनेश हरी राक्षिक बुडून बेपत्ता झाला. अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने दरडग्रस्त भागातील 314 कुटुंबातील 1 हजार 139 नागरिकांना, तर धोकादायक इमारतीतील 15 कुटुंबातील 111 जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

अतिवृष्टीने अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची भीती वर्तवली जातेय, अशातच श्रीवर्धनमध्ये दरड कोसळली मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. बुधवारी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. गुरुवारी पहाटे पासून देखील पावसाने सुरवात केली. कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जाहीर केला आहे. तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने दोन दिवस आधीच आगमन झाले. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले . पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचणे, वृक्ष उन्मळून पडणे, वीज पुरवठा खंडीत होणे यांसारख्या घटनांची नोंद झाली. पहिल्याच पावसात नद्या, नाले दुथडी भरून वाहण्यास सुरवात झाली होती. जिल्ह्यात श्रीवर्धन येथे रोहिदास आळीत जयवंत एटम यांच्या घरावर दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

अलिबाग समुद्रात एक जण बुडाला

जिल्ह्यात 9 ते 11 जून, या तीन दिवशी अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याकाळात मच्छीमारीलाही बंदी घालण्यात आली आहे. असे असताना अलिबाग कोळीवाडा येथील दिनेश राक्षिकर हा सकाळी कुलाबा किल्ल्याच्या मागे खडकांत असलेली खुबी (कालवे) पकडण्यास गेला होता. त्यावेळी भरतीचे पाणी वाढल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याचा मृतदेह सायंकाळी साडेपाच वाजता अरुण कुमार विद्यालयाच्या मागच्या बाजूस समुद्र किनारी सापडला.

प्रशासन अलर्ट

अतिवृष्टीच्या पाश्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन , जिल्हा व तालुका प्रशासन अलर्ट झालेय. गावोगावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या बैठका घेऊन खबरदारी संदर्भात आवश्यक त्या सूचना प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात रिक्षा वाहन फिरवून ग्रामपंचायत मार्फत जनजागृती देखील केली जातेय.

दरदग्रस्त भागातील 314 कुटूंबातील 1139 जणांना हलवले

रायगड जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टी असल्याने मुसळधार पावसाने भूसखलन होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 103 गावे ही दरडग्रस्त भागात आहेत. अतिवृष्टीच्या अनुषंगाने पेण तालुक्यातील 73 कुटुंबातील 309, कर्जत 7 कुटुंबातील 48, खालापूर 28 कुटुंबातील 102, महाड 164 कुटुंबातील 525, पोलादपूर 23 कुटुंबातील 68, म्हसळा 19 कुटुंबातील 47, श्रीवर्धन मधील 40 जणांना, असे 314 कुटुंबातील 1 हजार 139 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर, धोकादायक घरातील 15 कुटुंबातील 111 जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

जिल्ह्यात सरासरी 58 मि.मी पावसाची नोंद

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अलिबाग – 60 मि.मी, पेण – 58 मि.मी, मुरूड – 65 मि.मी, पनवेल – 113.60 मि.मी, उरण – 40 मि.मी, कर्जत – 41.80 मि.मी, खालापूर – 53 मि.मी, माणगाव – 53 मि.मी, रोहा – 64 मि.मी, सुधागड – 48 मि.मी, तळा - 56 मि.मी, महाड – 53 मि.मी, पोलादपूर - 43 मि.मी, म्‍हसळा – 53 मि.मी, श्रीवर्धन – 103 मि.मी, माथेरान – 39.40 मि.मी पाऊस पडला.

आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाकडे संपर्क करण्याचे आवाहन

दरम्यान येत्या २४ तासांत जिल्ह्यात अतिवृष्टीची अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे, जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य २० दरडग्रस्त गावांतील नागरिकांचे स्थलांतरण सुरू करण्यात आले आहे. तर, नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी समुद्र आणि नदीकिनाऱ्यावर पोहण्यास जाऊ नये, धबधब्यांच्या ठिकाणी वर्षासहलीस जाऊ नये, घरात सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले. आपतकालीन परिस्थितीत ०२१४१-२२२११८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस सर्व दुकाने बंद राहणार

10 आणि 11 असे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे, मुसळधार पाऊस आणि वारे वाहणार असल्याने दोन दिवस जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. वैद्यकीय सेवेतील रुग्णालये, मेडिकल, पॅथालॉजी सुरू राहणार आहेत. 10 आणि 11 जून दरम्यान इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले.

Tags:    

Similar News