लग्न नव्हे घटस्फोटाची निमंत्रण पत्रिका

Update: 2022-09-13 13:06 GMT

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय असा सोहळा असतो. आपल्या या आनंद सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं यासाठी पत्रिका छापून लोकांना निमंत्रित करण्याची पद्धत सर्वत्र रूढ आहे. पण हेच लग्न मोडण्यासाठी लोकांना निमंत्रित करण्याची पद्धत तुम्ही कधी ऐकली आहे का ? नाही ना? पण हो असं घडलं आहे.

मध्यप्रदेशमधील भोपाळमध्ये अशीच एक पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. भोपाळमधील एका सामाजिक संस्थेने 18 पुरुष घेत असलेल्या घटस्फोटाची पत्रिका तयार केली आहे. भाई वेल्फेअर सोसायटी ही संस्था घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये पुरुषांना मदत करण्याचं काम करते. अशाच एका घटस्फोटाची निमंत्रण पत्रिका या संस्थेने तयार केली आहे. तीच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 18 सप्टेंबर रोजी हा घटस्फोटाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण ही पत्रिका व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याने हा सोहळा आता रद्द करण्यात आला आहे असं वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

भाई वेल्फेअर सोसायटी तर्फे पुरुषांच्या मदतीसाठी एक हेल्पलाइन देखील चालवली जाते. या व्हायरल पत्रिकेनंतर संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना माध्यमांनी गाठलं. त्यावेळी घटस्फोटासारख्या प्रकरणांमध्ये पुरुषांना आर्थिक, सामाजिक आणिच मानसिक दृष्ट्या फार मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या त्रासातून ते स्वतंत्र होत असताना त्याचा सोहळा झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.

या घटस्फोटाच्या सोहळ्यामध्ये काही विधी देखील करण्यात येणार होते. ज्यामध्ये लग्नात एकमेकांना घातल्या जाणाऱ्या फुलांच्या हारांचे विसर्जन केलं जाणार होते. त्याचबरोबर महिलांसाठी असलेल्या संगीत सारखाच पुरुषांसाठी संगीताचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार होता. पण काही स्थानिक संघटनांनी विरोध केल्यानंतर या संस्थेने हा सोहळा आता रद्द केलेला आहे.

Tags:    

Similar News