विधानपरिषदेचा पराभव भाजपला विशेष झोंबला: अजित पवार

Update: 2020-12-15 12:27 GMT

विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून परखड शब्दांमध्ये टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय चर्चा भाषणात या मुद्द्यांना प्रखर प्रत्युत्तर दिलं. अनेक मुद्द्यांवरून त्यांनी विरोधकांना चांगलेच चिमटे देखील काढले. 'काहींना तीन पक्षांचं सरकार आल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास गेल्यामुळे त्याचं वाईट वाटणं साहजिक आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात झालेला पराभव तर विशेष झोंबला आहे', असं अजित पवार बोलताना म्हणाले.

देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील या भाजपच्या दिग्गज मंडळींनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांमध्ये निशाणा साधल्यानंतर अजित पवार बोलण्यासाठी उठले. यावेळी देखील बोलायला देण्याच्या वेळेवरून शाब्दिक वाद झाला. त्यानंतर अजित पवारांनी फटकेबाजी करायला सुरुवात केली. 'सुरुवातीला विरोधक म्हणाले की हे सरकार ६ महिन्यांत जाईल, मग म्हणाले वर्षात जाईल, पण ते झालं नाही. नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघात झालेला नागपूर पराभव झोंबला आहे. नागपूरमध्ये पराभव झाल्यामुळे भाजपमधल्याच एका गटाला उकळ्या फुटत आहेत. तर दुसऱ्या गटाला प्रश्न पडले आहेत. पुण्यात देखील पहिल्या राऊंडलाच उमेदवार निवडून आला. औरंगाबादचे सतीश चव्हाण देखील प्रचंड मतांनी निवडून आले. नंदुरबारला आमचेच अमरिश पटेल तिकडे गेल्यामुळे ती जागा आली', असं अजित पवार यावेळी म्हणाले. अमरिशभाई पण परत येतील

'अमरावतीमध्ये आमचं थोडंसं चुकलं. आमचा अधिकृत उमेदवार पराभूत झाला, बंडखोर उमेदवार निवडून आला. समाधान याचं आहे की भाजपचा आला नाही. जे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीतून तिकडे गेलेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. ते कधी राजीनामे देऊन इकडे येतील, काही सांगता येत नाही. परत म्हणू नका की मी आधी का नाही सांगितलं', असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना चिमटे काढले.

Tags:    

Similar News