चीनकडून भारतातील गाढवांची तस्करी ; देशातील गाढवांची संख्या ६१.२३ टक्क्यांनी घटली

चीनने आपल्या देशी औषधांसाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल म्हणून भारतातील गाढवांची तस्करी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये मागील नऊ वर्षांत देशातील गाढवांची संख्या ६१.२३ टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे.

Update: 2021-12-23 02:52 GMT

नागपूर : चीनने आपल्या देशी औषधांसाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल म्हणून भारतातील गाढवांची तस्करी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये मागील नऊ वर्षांत देशातील गाढवांची संख्या ६१.२३ टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. देशात बहुतांश राज्यांतून गाढवांची तस्करी करून ही गाढवे चीनमध्ये पोहोचत असल्याचे समोर आले आहे.

ब्रुक इंडियाने नुकताच हा अहवाल केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडे दिला आहे. २०१२ च्या पशुधन गणनेच्या तुलनेत २०१९ च्या नवीन पशुधन गणनेनुसार गाढवांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गाढवांची संख्या तब्बल ६१.२३ टक्क्यांनी कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे. २०१२च्या पशुधन गणनेत भारतात गाढवांची संख्या ०.३२ दशलक्ष होती, तर २०१९च्या पशुधन गणनेमध्ये ती केवळ ०.१२ इतकी आढळली आहे. ब्रुक इंडियाच्या टीमने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश आणि गुजरात या राज्यांत सर्वेक्षण केले. गाढवांच्या कातडीची तस्करी ही चीनमध्ये मोठ्या प्रमाणात होत असते चीनसह इतरही अनेक देशात कमी अधिक प्रमाणात तस्करी होत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. ब्रुक इंडियाचे शरत के. वर्मा महाराष्ट्रातील प्रसिद्ध जेजुरी यात्रेत गेले होते. या यात्रेत गाढवे मोठ्या संख्येने असतात. गेल्या काही वर्षात ही संख्या कमी झाल्याचे यात्रेकरूंनी सांगितल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या अभ्यासामध्ये केला आहे. तर राजस्थानमध्येही गाढवांचा मेळावा आयोजित केला जातो, तिथेही गाढवांच्या संख्येत घट झाली आहे.

याआधी भारतातून वाघांच्या अवयवांची तस्करी चीनमध्ये केली जात होती. मात्र, आता कातडीसाठी गाढवांची देखील तस्करी चीनमध्ये केली जात असल्याचे ब्रुक इंडियाच्या सर्वेक्षणातून उघड झाले.

गाढवांच्या कातडीचा वापर रक्तस्त्राव, चक्कर, निद्रानाश, कोरडा खोकला यासाठी तयार करण्यात येत असलेल्या औषधांमध्ये केला जातो. 'इजियाओ' हे पारंपरिक चिनी औषध तयार करण्यासाठी देखील गाढवांच्या कातडीचा वापर केला जातो.

Tags:    

Similar News