शिर्डीच्या साईबाबा विश्वस्त मंडळ नेमणुकीसंदर्भात बदललेल्या नियमावलीला आव्हान ; इच्छूकांची धाकधुक वाढली

आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान म्हणून ओळख असलेले आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त नियुक्तीबाबत राज्य सरकारने नियमावली बदलली आहे. या नेमणुकीसंदर्भातील नियमावलीला आक्षेप घेत आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे इच्छूकांची धाकधुक वाढली

Update: 2021-07-27 10:37 GMT

शिर्डी  :  आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान म्हणून ओळख असलेले आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त नियुक्तीबाबत राज्य सरकारने नियमावली बदलली आहे. या नेमणुकीसंदर्भातील नियमावलीला आक्षेप घेत आव्हान देण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी, संजय काळे, उत्तम शेळके या नेमणुकी संदर्भातील नियमावलीला दिवाणी अर्जाद्वारे आव्हान दिले आहे. याबाबत आता 30 जुलै रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती अ‍ॅड. अजिंक्य काळे यांनी दिली. दरम्यान नियमावलीला आक्षेप घेतल्यामुळे इच्छुकांची मात्र धाकधूक वाढली आहे. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या या महत्वपुर्ण सुनावणीकडे आता संपुर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

20 जुलै रोजीच सोशल मीडियावर संस्थानच्या 16 संभाव्य विश्वस्तांची नावे व्हायरल झाली होती. संभाव्य विश्वस्तांचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट देखील फिरत होत्या. मात्र, संभाव्य विश्वस्त मंडळाच्या यादीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, अपात्र ठरलेले, तसेच शासनाला फसवलेल्या व्यक्तींची नावे असल्याने काही नागरिकांनी आक्षेप घेतला होता. उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे संबधित संभाव्य विश्वस्त नसल्याने या नावांना आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं.

दरम्यान, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्ती संदर्भात राज्य सरकारनेअधिसूचना जारी करण्यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात मुदतवाढ देखील मागितली होती,त्यानंतर न्यायालयाने दोन आठवड्याची मुदतवाढ दिली होती. दरम्यान विश्वस्त मंडळ नेमणुकीसंदर्भातील याचिकेवर काल (दि.26) औरंगाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी पुन्हा अधिसूचना जाहीर करण्यासाठी अंतिम दोन आठवड्याची मुदतवाढ मागितली, त्यावर न्या.एस.व्ही.गंगापूरवाला व न्या.आर. एन. लड्डा यांनी राज्य सरकारला आणखी दोन आठवड्याची मुदतवाढ दिली आहे.

दरम्यान राज्य शासनाने शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त नियुक्तीबाबत नियमावली बदलली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विश्वस्त मंडळाची नियुक्ती लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने इच्छूकांची धाकधुक वाढली आहे.

Tags:    

Similar News