बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न का?

उत्कंठावर्धक सामन्याप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या बिहार विधानसभेच्या अंतिम सामन्यात एनडीएने बाजी मारली असली तरी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूच्या जागा कमी होण्यामागे भाजपचे षडयंत्र असल्याचे सांगितले जात आहे. एनडीएच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुरु असताना आता काँग्रेसकडून नितीश कुमार यांना भाजपाची साथ सोडण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्नची चर्चा सुरु झाली आहे.

Update: 2020-11-11 07:27 GMT

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत अंतिम क्षणापर्यंत चाललेल्या अटीतटीच्या लढतीत एनडीएने महाआघाडीला धोबीपछाड देत सत्ता राखली आहे. एनडीएला काठावरचं बहुमत मिळालं आहे. मात्र, एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूला कमी जागा मिळाल्या आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच भाजपच्या जागा जास्त आल्या तरी नितिश कुमारच मुख्यमंत्री होतील असं जाहीर केलं आहेत. अशात काँग्रेसकडून नितीश कुमार यांना भाजपाची साथ सोडण्यासाठी ऑफर देण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत नितीश कुमार यांच्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवत ऑफर दिली आहे आणि नितीश कुमार यांना सावध होण्याचा सल्ला दिला आहे. "भाजपा/संघ अमरवेलीसारखे आहेत. ज्या झाडाला वेढतात, ते झाड वाळून जात आणि वेल मात्र वाढीस लागते. नितीशजी, लालूजींनी आपल्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनात तुरुंगातही गेले आहेत. भाजपा-संघाची विचारधारा सोडून तेजस्वींना आशीर्वाद द्या. या अमरवेली रुपी भाजपा-संघाला बिहारमध्ये आश्रय देऊ नका," असा राजकीय सल्ला देत काँग्रेसनं महागठबंधन आघाडीसोबत येण्याची ऑफर दिली आहे.

"नितीशजी, बिहार आपल्यासाठी छोटं झालं आहे. आपण भारताच्या राजकारणात यावं. सर्व समाजवादी, धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचं एकमत करण्यासाठी मदत करा आणि संघाची इंग्रजांनी रुजवलेली फोडा आणि राज्य करा नीतिला वाढू देऊ नका. याचा विचार जरूर करावा," असं म्हणत दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमारांना राष्ट्रीय राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे.

"महात्मा गांधी व जयप्रकाश नारायण यांच्या प्रति खरी श्रद्धांजली ठरेल. आपण त्यांच्याच वारशातून निर्माण झालेलं नेतृत्व आहात. तिथे परत या. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, जनता पार्टी संघाच्या दुहेरी भूमिकेमुळेच फुटली होती. भाजपा संघाला सोडा आणि देशाला होणाऱ्या उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा," असं आवाहन दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना केलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल मंगळवारी रात्री घोषित करण्यात आले. निवडणुकीत एनडीएने १२५ जागा जिंकल्या असल्या तरी नितीश कुमार यांच्या जदयूची मोठी पीछेहाट झाली आहे. जदयूच्या जागा कमी होण्यामागे भाजपाची रणनीती असल्याची चर्चा जदयु पक्षात सध्या सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्र पॅटर्नची बिहारमधे अंमलबजावणी होणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.बिहारमधे महाराष्ट्र पॅटर्न का?

Tags:    

Similar News