बदलापुरात पावसाने उडवली सर्वांचीच दैना!

Update: 2021-07-22 08:36 GMT

बदलापूर- राज्यभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सध्या बदलापुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. उल्हास नदी ओसंडून वाहत असल्याने नदीपात्रालगतच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रालगतची गावं पाण्याखाली गेली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे.



 


जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरल्याने केंद्र बंद

सोबतच मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या काठावर असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात देखील पाणी शिरलं आहे. त्यामुळे हे जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे.उल्हास नदीची धोक्याची 17.50 मीटर पातळी एवढी असून सध्या उल्हास नदी 17.80 मीटर क्षमतेने वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. नदीवर नवीन बांधण्यात आलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. खडवली आणि टिटवाळा या दोन गावांना जोडणारा हा रस्ता होता. त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.


गृहसंकुलांमध्ये शिरलं पावसाचे पाणी

उल्हास नदीच्या किनार्याेवर असलेल्या रमेशवाडी हेंद्रे पाडा आणि वालिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी गृहसंकुलांमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. टिटवाळा गणपती मंदिराच्या मागे असणारी काळू नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

बदलापूर रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

सोबतच बदलापूरातील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला आहे. रेल्वे ट्रॅकवर जवळपास दोन फूटापर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

Similar News