...तर अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन- जिल्हाधिकारी

अहमदनगर जिल्हा अनलॅाक होताच नागरिकांचा बेजबाबदारपणा देखील दिसू लागला आहे. जिल्ह्यात काही निर्बंधासह अनलॉकची घोषणा होताच नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी म्हंटले आहे.

Update: 2021-06-10 03:20 GMT

अहमदनगर जिल्ह्यात लॅाकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज राहुरी, राहता, संगमनेर व अकोले तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी अकोले ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. तेथील ऑक्सिजन प्लॅन्टच्या कामाची पाहणी डॉ. भोसले यांनी केली तसेच 100 ऑक्सिजन बेडच्या सुविधेबाबत सुचना केल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मुकेश कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय घोगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे, नगरपंचायत मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब मेहेत्रे, डॉ. सुनिल साळुंके उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात निर्बंध शिथिल झालेत मात्र कोरोना अद्याप गेलेला नाही.जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झालेली आहे. ऑक्सिजन बेडवरील रुग्णसंख्या ही काठावर आहे.त्यामुळे सगळी जबाबदारी प्रशासनावर न टाकता नागरिकांनी देखील सहकार्य करायला हवे.

नागरिकांनी स्वतः तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीनी स्वयंस्फूर्तपणे पुढे येवून जनता कर्फ्यू केला पाहिजे. सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे दिवसभर व्यवसायाला ग्राहक नसतात, त्यामुळे व्यापाऱ्यांनी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवून 2 नंतर दुकाने बंद ठेवली पाहिजे. ज्यामुळे रस्त्यावर फिरणार्‍यांची संख्या कमी होईल. हिवरे बाजार ग्रामपंचायतप्रमाणे अकोले शहराने नियोजन करुन अकोले पॅटर्न राज्याच्या समोर आणावा. अन्यथा स्वतः निर्बंध घातले नाही तर कोरोना रुग्णसंख्या वाढेल आणि नाविजलाजस्तव पुन्हा लॅाकडाऊन करावा लागेल. आणि याला जबाबदार नागरीक व व्यापारीच राहतील.

दरम्यान तिसर्‍या लाटेसंदर्भात बोलताना डॉ. भोसले म्हणाले की , जिल्ह्यात 22 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होईल, असे नियोजन केले आहे. जिल्ह्यात 14 ग्रामीण रुग्णालयामंध्ये लाईट, जनरेटर व सिलेंडर अश्या सर्व सुविधासह ऑक्सिजन प्लॅन्ट व 100 ऑक्सिजन बेडची व्यवस्था प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात करण्याचे काम सुरू आहे . 15 जून 2021 पर्यंत ऑक्सिजन प्लॅन्ट कार्यन्वित होणार आहे.

तिसर्‍या लाटेतील लहान मुलांवरील प्रार्दुभाव लक्षात घेता रुग्णालयात लहान मुलांसाठी 10 बेडचा स्वतंत्र कक्ष असेल व या मुलांवर उपचारासांठी सद्य स्थितीतील वैद्यकीय अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तेच वैद्यकीय अधिकारी मुलांवर उपचार करतील, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

Tags:    

Similar News