टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील 19 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील 19 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आले

Update: 2021-12-24 14:57 GMT

अहमदनगर// अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील 19 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आले. सर्व विद्यार्थ्यांना टाकळी ढोकेश्वर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून हे सर्व विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे वसतिगृहात जेवण बनविण्यासाठी साहित्य घेऊन येणाऱ्यांची शाळेत ये-जा असल्याने हे विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याचा अंदाज आहे.

दरम्यान नवोदय विद्यालयात एकूण 450 विद्यार्थी शिक्षण घेत असुन इतरही विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात असल्याचे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. सोबतच कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची भीती जिल्हाधिकारी भोसले यांनी व्यक्त केली.

दरम्यान एवढया मोठ्या संख्येने विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेचे डॉ. मंगेश वाळुंज आणि चालक विशाल पारखे यांनी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

अहमदनगर जिल्ह्यात ओमायक्रोनचा शिरकाव

एकीकडे अहमदनगर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच शाळेतील विद्यार्थी कोरोना बाधित आढळले असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे ती म्हणजे, जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळला आहे. संबंधित रुग्ण आपल्या कुटुंबासह नायझेरियातून प्रवास करून आल्याची माहिती आहे. दरम्यान याच कुटुंबातील एक व्यक्ती कोरोना बाधित आढळला असून त्यांच्या संपर्कातील तब्बल 55 जणांची चाचणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली आहे.

श्रीरामपूर तालुक्यात सर्वात कमी लसीकरण

सोबतच अहमदनगर जिल्ह्यात सर्वात कमी लसीकरण हे श्रीरामपूर तालुक्यातच झाले असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले. श्रीरामपूर खालोखाल पाथर्डी तालुक्यात सर्वात कमी लसीकरण झाले त्यामुळे सर्वच तालुक्यातील आरोग्य यंत्रणाना लसीकरणावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी भोसले यांनी केले.

Tags:    

Similar News