काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मानवाधिकार आयोगात काश्मिरी पंडितांचा एक प्रतिनिधी नेमला जावा अशी मागणी राज्यसभेत मंगळवारी केली. राज्यसभेत मानवाधिकार संशोधन विधेयकावर झालेल्या चर्चेत सहभागी होत खा. राऊत यांनी या विधेयकाला समर्थन देत शिवसेनेची भूमिका मांडली.
अनेक वर्षांपासून कश्मिरी पंडितांचे हाल झाले आहेत. त्यांचा नरसंहार झालाय. मात्र, कश्मिरी पंडितांच्या बाबतीत कोणी आवाज उठवत नाही. 30 वर्षांपूर्वी जुलूमजबरदस्ती करून कश्मिरी पंडितांना कश्मीरच्या खोर्यातून हुसकावून लावण्यात आले. त्यांचे पुनर्वसन करणे हाच खरा मानवाधिकार ठरेल. त्यामुळेच कश्मिरी पंडितांचे पुनर्वसन होईपर्यंत मानवाधिकार आयोगात कश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी नेमण्याची मागणी खा. राऊत यांनी केली.
या देशात काही लोक फतवे काढतात, जिहादची भाषा करतात. हे मानवाधिकाराचं उल्लंघन असून ही फतवेबाजी रोखण्याचीही आग्रही मागणी खा. संजय राऊत यांनी केलीय.