राहुल नार्वेकरांच्या विरोधात विरोधक आक्रमक, पदाचा गैरवापर, आचारसंहिता भंगाचा आरोप

Opposition aggressive against Rahul Narvekar, allegation of abuse of office, violation of code of conduct

Update: 2026-01-02 13:56 GMT

मुंबई : सध्या महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणूकांचा रणसंग्राम सुरुय. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एका व्हिडिओ व्हायरल होतोय. तर दुसरीकडे नार्वेकर यांच्यावर पदाचा गैरवापर करत आचारसंहित भंग केल्याचा आरोप राजकीय नेत्यांनी केलाय.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यातील वादाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुमारे ७ मिनिटांच्या हा व्हिडिओ मुंबईतल्या भायखळा इथल्या रिचर्डसन क्रूडासमधील निवडणूक कार्यालयाबाहेरचा आहे. कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. शिवाय याच मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ आणि २२७ मधून नार्वेकर यांचे भाऊ मकरंद, बहीण गौरवी शिवकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल करतांना राहुल नार्वेकर हे स्वतः उपस्थित होते. 

यावेळी भाजप वगळता इतर उमेदवारांना पोलिसांच्या माध्यमातून धमकाविण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. दरम्यान, इतर उमेदवारही ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या आत अर्ज दाखल करण्यासाठी इथं पोहोचले होते. मात्र, त्यांना पोलिसांच्या मदतीनं निवडणूक कार्यालयातून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप, हरिभाऊ राठोड यांनी केलाय. या संदर्भात राठोड यांनी जाब विचारायला सुरुवात केल्यानंतर राठोड हे प्रशासनावर दबाव आणत असल्याचा आरोप केला. राठोड यांना शासनानं पुरविलेली पोलीस सुरक्षा काढण्याचे आदेश नार्वेकर यांनी पोलीस उपायुक्तांना दिले. या वादाचा सुमारे ७ मिनिटांचा व्हिडिओच शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी “सन्माननीय अध्यक्ष महोदय” असे कॅप्शन देत ट्विट केलाय.

(

)

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले ७० अधिकारी-कर्मचारी हे नार्वेकरांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय आहेत, त्यांच्यावरही निवडणूक आयोगानं आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करुन त्यांना पदमुक्त करण्याची मागणी केलीय.

(

)

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी रितसर लेखी तक्रारही केली आहे.

(

)

या तीनही प्रभागामध्ये विरोधी उमेदवारांनी फॉर्म भरले, टोकन घेतले, अर्जाची पडताळणीही झाली, अनामत रक्कमही भरली. दरम्यानच्या काळात राहुल नार्वेकरही घटनास्थळी उपस्थित होते, असा आरोप अर्ज न स्विकारलेल्या उमेदवारांनी केलाय.

दरम्यान, राहुल नार्वेकर यांचा निवडणुक प्रक्रियेतल्या वाढत्या हस्तक्षेपावर आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनीही आक्षेप घेतलाय.

(

)

दरम्यान, विरोधकांनी आधीच निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यपद्धतीवर आक्षेप घेतलेले आहेत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून थेट निवडणूक प्रक्रियाच प्रभावित करण्यात येत असल्याचा आरोप केला जातोय.

Tags:    

Similar News