सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरु आहेत. मात्र, तरीही सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एका आंदोलनानं वेधून घेतलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेवरुन परीक्षार्थी उमेदवारांनी आंदोलन सुरु केलंय. मुळात ही जाहिरातच ७ ते ८ महिने उशीरा निघाल्यामुळं अनेक पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले आहेत. या उमेदवारांनी आता आंदोलनाचं हत्यार उपसलंय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) पूर्व परीक्षा (गट ब) 2025 च्या जाहिरातीमध्ये एकूण ६७४ पदे जाहीर झाली. त्यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी (PSI) ३९२ पदांचा समावेश आहे. त्यामुळं PSI पदासाठीची पात्र वयोमर्यादा वाढीबाबत सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुळातच ही जाहिरात 7 ते 8 महिने उशिरा निघाली. त्यामुळे हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले. संतप्त उमेदवारांनी याविरोधात आंदोलनाला सुरुवात केलीय. या आंदोलनाला आता विविध राजकीय नेत्यांनी पाठिंबा देत सरकारवर जोरदार टीका केलीय.
काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत, “ ही चूक विद्यार्थ्यांची नसून शासनाच्या अपयशी नियोजनाची असल्याचे म्हटले आहे. बेरोजगारीच्या काळात मेहनती तरुणांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एक वर्षाची वय सवलत द्यावी किंवा वय गणना १ जानेवारी 2025 गृहीत धरावी, अशी मागणी केली आहे.
माजी मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसी बळाचा वापर केल्याचा आरोप करत NSUI पदाधिकाऱ्यांच्या अटकेचा निषेध केला आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनीही PSI वयवाढीचा निर्णय न झाल्यास विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात उतरण्याचा इशारा दिला आहे. शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर न करता संवादातून प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र काँग्रेसनेही विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कारवाईचा निषेध करत PSI वयवाढीच्या मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी केली आहे.
PSI वयोमर्यादा वाढीचा प्रश्न ऐन परीक्षेच्या तोंडावर अद्याप प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.