5 राज्यांच्या निकालानंतर महाराष्ट्राचे काय? संजय राऊतांचे 'रोखठोक' मत

Update: 2021-05-02 03:04 GMT

5 राज्यांच्या निकालानंतर भाजप महाराष्ट्राकडे लक्ष वळवणार असल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जातो. यासर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनामधील आपल्या रोखठोक सदरातून या चर्चेवर भाष्य केले आहे. त्यांनी काय म्हटले आहे ते थोडक्यात पाहूया....

हा दिवस देशाच्या राजकीय पटलावर धक्कादायक आणि खळबळजनक ठरेल काय? हा प्रश्न राजकीय वर्तुळात सगळय़ांना पडला आहे. देशाच्या लोकशाहीचा डोलारा आज संपूर्णपणे कलला आहे. तो पूर्ण खाली कोसळू द्यायचा नसेल तर प. बंगालात ममता बॅनर्जींचा विजय ही काळाची गरज आहे. प. बंगाल विधानसभा निवडणुकांमुळे देशाच्या राजकारणाचे चित्र थोडे तरी बदलेल काय? याआधी मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली. तेव्हा हे चित्र बदलून टाकणारे निकाल आहेत, असा डंका पिटला, पण पुढच्या लोकसभेत (2019) दोन्ही राज्यांत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. राजस्थानात अशोक गेहलोत त्यांच्या पुत्रासही जोधपूरमधून निवडून आणू शकले नाहीत. मध्य प्रदेशातल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचा गट भाजपने फोडून काँग्रेसची सत्ताच हिसकावून घेतली. याचे कारण मोदी यांची लोकप्रियता आता घसरत आहे खरे, पण त्यांच्यासमोर उभे राहील असे नेतृत्व आजही उभे नाही. प. बंगालच्या निकालानंतर श्रीमती ममता बॅनर्जी मोदीविरोधकांची गोळाबेरीज करून दिल्लीत ठाण मांडून बसतील, तेव्हा काय चित्र होईल? यावर पुढच्या घडामोडी अवलंबून आहेत

प. बंगालच्या निकालानंतर श्री. अमित शहा हे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत लक्ष घालतील, असे जे सांगितले जाते ते कशाच्या आधारावर? एक तर पैशांचा व बळाचा वापर करून आमदार फोडाफोडी केली जाईल किंवा कोरोना स्थिती हाताळण्यात अपयश आल्याचे कारण देऊन राष्ट्रपती राजवट लावली जाईल. कोरोना स्थितीचेच कारण असेल तर केंद्रातल्या सरकारलाही सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही हे आधी प्रामाणिकपणे स्वीकारायला हवे. औषधे व ऑक्सिजनअभावी रोज पाच हजारांवर चिता पेटत असताना हे राजकीय खेळ कोणाला सुचतात कसे? महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न आतापर्यंत फसले आहेत. या पुढेही ते यशस्वी होतील असे मला दिसत नाही. सरकारात उरले आहे काय?

2 मेनंतर महाराष्ट्रात घडामोडी होतील असे जे म्हणतात त्यांना माझा एकच प्रश्न. महाराष्ट्रातील घडामोडींचे हादरे दिल्लीसही बसू शकतील असे वातावरण आज देशात आहे. प. बंगाल हा त्याचा केंद्रबिंदू असेल. आज काय होतंय ते पाहूया.

Similar News