Mumbai Municipal Corporation Corruption : भ्रष्टाचार ठाकरे कुटुंबाने केला असेल तर त्यांची चौकशी सत्तेत असलेल्यांनी का नाही केली?

मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार कुणी केला? ठाकरे कुटुंबीय, शिंदेसेना की भाजपाने ? खरा जबाबदार कोण? निवडणुकीच्या निमित्ताने अस्सल मुंबईकर यांचं पत्र वाचा

Update: 2026-01-08 10:50 GMT

राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा चांगलाच धुरळा उडाला आहे. या धामधूमीत जनतेपुढे एक महत्त्वाची गोष्ट सातत्याने बोलली जात आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार... सत्ताधारी पक्षाकडून या भ्रष्टाचाराला ठाकरे कुटुंब जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. यावर मी अस्सल मुंबईकर म्हणून मला पडलेले काही प्रश्न या पत्राच्या माध्यमातून उपस्थित करत आहे. 

मुंबईकर मित्रांनो,

पत्राचा विषय : मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार कुणी केला? ठाकरे कुटुंबीय, शिंदेसेनेना की भाजपाने ? खरा जबाबदार कोण?

गेल्या दोन दशकांत मुंबई महानगरपालिकेत किती मोठा भ्रष्टाचार झाला, अशी ओरड आणि याची चर्चा सातत्याने घडवण्यात येत आहे. मात्र यावर मला आणि तुम्हाली प्रश्न पडला असेल की, या भ्रष्टाचाराला जबाबदार नेमका कोण? गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेवर शिवसेना आणि भाजप यांची संयुक्त राजवट होती. दोघांनी मिळून सत्ता सांभाळली. मग आज जर कुणी विचारतो की "भ्रष्टाचार कोणी केला?"  तर त्याचे उत्तर त्यांच्याकडेच असायला हवं ना?

जुने २०२२ पासून शिवसेनेची ओळख, पक्ष, चिन्ह, नाव आणि पक्षाचे अनेक नगरसेवक, आमदार हे सर्व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात गेले, ज्यांना भाजपाने मुख्यमंत्री बनवलं होतं. म्हणजे गेल्या २५ वर्षांत पालिकेत सत्ता गाजवणारे बहुसंख्य नगरसेवक आज शिंदे गटातच आहेत. जर इतका भ्रष्टाचार एकट्या ठाकरे कुटुंबाने केला असेल तर त्यांची चौकशी २०२२ पासून सत्तेत असलेल्यांनी का नाही केली? खरं तर २०१४ ते २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा त्यांनी चौकशी का नाही केली?

एक लक्षात घ्या की उद्धव ठाकरे, ना आदित्य ठाकरे यांनी महापालिकेतील स्थायी समितीवर काम केलं, ना त्यांनी महापौर पद भूषवलं. ते पालिकेच्या रोजच्या कारभारात सहभागी नव्हते. रोजच्या कारभारातले जे प्रत्यक्षात पालिकेत निर्णय घेत होते, ते बहुतेक नगरसेवक आज एकनाथ शिंदेकडे आहेत ना? आणि त्यांची सत्ता सुध्दा आहे? मग सर्व भ्रष्टाचार फक्त ठाकरे कुटुंबाने कसा केला? तेव्हाच सगळे नगरसेवक, अधिकारी, स्थायी समितीचे अध्यक्ष, भाजपचे सहयोगी हे सर्व निर्दोष होते का?

आज निवडणुका जवळ आल्यावर सगळ्यांना भ्रष्टाचार आठवतोय पण त्याच्या मुळाशी कोण होता हे स्पष्ट करायला हवं. हे पत्र कुठल्याही पक्षाच्या बाजूने नाही, पण एक सामान्य मुंबईकर म्हणून, तुमच्या सारख्याच एका सुजाण मतदाराचं प्रश्न आहे  "सत्तेत असलेल्यांनी जबाबदारी घ्यायची नसेल तर मग कोण घेणार?" भविष्यात मत देताना हे प्रश्न विचारूया. आणि जबाबदार लोकांनाच सत्तेच्या खुर्चीत बसवूया.

आपला नम्र,

अस्सल मुंबईकर

Similar News