FatherDay हरी नरकेंकडे नाही वडीलांचा फोटो

Update: 2022-06-19 14:18 GMT

वडील गेले तेव्हा मी खूप लहान होतो.घरची परिस्थिती गरिबीची होती. ते गंभीर स्वरूपाच्या आजाराने अंथरुणाला काही वर्षे खिळलेले होते. त्यांना दवाखाणन्यात न्यायला किंवा औषधे आणायलाही पैसे नव्हते. अशा परिस्थितीत फोटो कुठून काढणार? लेखक अभ्यासक हरी नरके सांगताहेत जागतिक पितृदिनी वडीलांची आठवण..

त्यांचा आजार खूप वाढला तेव्हा वेदनेने ते कळवळायचे. त्या वेदना असह्य झाल्या की त्यांना गुंगी यायची किंवा ते बेशुद्ध पडायचे. त्यांच्या पोटात खूप दुखत असायचं. चक्कर यायची आणि दोन शब्द बोलले तरी दम लागायचा.

त्याकाळात ते आमच्या झोपडीत न राहता मोकळ्या आभाळाखाली शेतातल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली राहायचे. बहुधा आपल्या सततच्या कण्हण्यामुळे, भयंकर वेदनांमुळे आपल्या छोट्या लेकरांना त्रास व्हायला नको, किंवा शेतात खुल्या आभाळाकडं बघत मोकळ्या हवेत त्यांना बरं वाटत असावं म्हणून असेल. पण शेवटचे कित्येक महिने ते शेतात राहायचे. शेतकरी,शेतमजूर यांचं सगळं जग म्हणजे शेतच ना!

सकाळ, दुपार, संध्याकाळ मी त्यांच्यासाठी तिकडे भाकरी घेऊन जायचो. मला शेतातल्या साप, विंचू ,सरडे यांची भिती वाटायची. एकदा भाकरी घेऊन जाताना मला विंचू चावला होता. तेव्हा खूप दुखलं होतं. मी खूप रडलो होतो.

बाबा गोधडीवर मलूल पडलेले असायचे. त्यांना जेवन जातच नसे. आंघोळ करण्याइतकं त्यांच्या अंगात त्राण नसायचं. मग मी विहीरीतनं पाणी काढून फडक्यानं त्यांचं अंग पुसून द्यायचो.

त्यांच्या वेदना फारच वाढल्या की कधीतरी ते खिशातून दहा पैसे काढून माझ्याकडे द्यायचे. मी औषधाच्या दुकानात जाऊन क्रोसिनच्या गोळ्या आणून त्यांना द्यायचो. तेच आणि तेव्हढेच त्यांचे औषद.

ससूनला जायला आई, वडील दोघेही घाबरायचे. तिकडे सरकारी डॅाक्टर गरिबाला "ढोस" देऊन मारून टाकतात असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. ती समजूत त्याकाळात गरीब वस्तीत सर्वदूर पसरलेली होती. खाजगी डॅाक्टर परवडणं शक्यच नव्हतं.

आई पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कुठेकुठे राबायची तेव्हा झोपडीतली चूल पेटायची. पहिलीच्या परीक्षेला जाताना मी त्यांच्या पाया पडलो तेव्हा ते काहीतरी पुटपुटले. " चांगली शाळा शिक. पास हो. तुझा निकाल येईपर्यंत मी असेन की नाही मला माहित नाही," असं काहीतरी ते म्हणत होते असं आई म्हणाली. ते तिथेच त्या झाडाखालीच गेले. अकाली गेले. वयाच्या ५० वर्षांच्या आतच. ते गेले तोवर मी मृत्यू पाहिलेला नव्हता. तुळशीच्या लग्नाचा दिवस होता. वडील म्हटलं की मला नेहमी फक्त एव्हढंच आठवतं. बाकी फारशा आठवणी नाहीतच. आजारपण अंगावरच काढायचं. तशीच रीत होती.

पुढेही कित्येक वर्षे तीच चालू होती. अगदीच हाताबाहेर गेलं तरच मनपाच्या दवाखान्यात जायचं हे पुढे खूप वर्षांनी घरात नव्याने सुरू झालं. गरीबांने दवाखान्याच्या पायऱ्या चढू नयेत हे भयंकर मूर्खपणाचं होतं. पण होतं. तसंच कितीही भूक लागली तरी हॉटेलात जाऊन खायचं नाही. उपास अंगावर काढायचा. हे काय विचित्र संस्कार होते! भूक लागली म्हणून हॉटेलात जाऊन मी एकट्याने काही खाल्ल्याची घटना नोकरीला लागून कित्येक वर्षे उलटल्यानंतरची आहे.

बरे दिवस आले तोवर वडील जगले असते तर मीही वडीलांचा एक फोटो काढला असता. वेळेवर औषदपाणी मिळते तर ते जगले असते. १९७० च्या काळात ही परिस्थिती असावी हे खेदजनक आहे.

-प्रा. हरी नरके

Tags:    

Similar News