आज संविधान दिवस! सोबतच्या फोटोमध्ये संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत संविधान समितीच्या एकमेव मुस्लिम महिला सदस्या बेगम एजाज रसूल आणि संविधान समितीचे सचिव एस. एन. मुखर्जी.
पंच्याहत्तर वर्षापूर्वी देखील आपल्या देशात सामाजिक वीण किती मजबूत होती त्याचे हे प्रतिनिधिक चित्र!
आपल्या संविधान समितीमध्ये 299 सदस्य होते त्यात देशभरातील विविध प्रांतांचे 229 सदस्य आणि संस्थानिकांचे 70 सदस्य होते. विविध प्रांतातील 229 सदस्यांपैकी पंधरा महिला सदस्य होत्या. तत्कालीन समाजातील महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण 7 टक्के होते तर पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण 25 टक्के होते. त्या काळचे सामाजिक वातावरण पाहू जाता पंधरा ही सदस्य संख्या पुरेशी मानली गेली यावरून तत्कालीन समाजाची मानसिकता लक्षात यावी.
समितीमधील महिला सदस्यांची नावे - अम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, रेणुका राय, लक्ष्मी नारायण मेनन, विजयलक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, पुर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी, लीलावती मुन्शी, मालती चौधरी, बेगम ऐजाज रसूल, ऍनी मॅस्करेन, जीवनबाला तायबजी, सरोजिनी नायडू.
देशातील शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, सर्वांना न्याय समानता स्वातंत्र्य यांचा समान लाभ मिळण्यासाठी, आपल्या संविधानातील सर्व नियम कायद्यांची अंमलबजावणी जितकी काटेकोरपणे होईल तितके संविधानाचे व्यापक समाजमूल्य जाणवेल!
संविधान दिवस चिरायू होवो!
समीर गायकवाड