खूप मोठा गॅप आहे...!!

समाजात घडणाऱ्या गोष्टींचे विश्लेषण करताना विचारवंत घाई करत आहे का? संपादक, विचारवंतांचा समाजाशी असलेला कनेक्ट तुटलाय का, त्यासाठी काय करणे गरजेचे आहे, याचे विश्लेषण करणारा मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांचा लेख....

Update: 2020-12-28 09:23 GMT

डावे-उजवे विचारवंत, सोशल मिडीयावरचे तज्ज्ञ आणि वस्तुस्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. मी सातत्याने लोकांमध्ये ( समविचारी नाही ) रँडम फिरतो, माहीती घेत असतो. त्यांचे जगण्याचे प्रश्न-वंचना वेगळे आहेत. विचारवंतांच्या मांडणीमध्ये त्यांचं प्रतिबिंब पडत नाही. डिस्कनेक्ट असल्यासारखं बोलतात, लिहितात, मांडत बसतात. प्रवाहाच्या विरोधात असण्याचे काही चिरेबंदी ठोकताळे आहेत, चौकटी आहेत. या चौकटीच्या बाहेर येऊन बोललं पाहिजे.

पेपर मधल्या बातम्या वाचूनही अनेक जण रिॲक्ट होत राहतात. शक्य झालं तर प्रत्यक्ष घटनास्थळी गेलं पाहिजे. राजकीय नेते जातात ना काही मोठी घटना घडली तर.. मग विचारवंत-संपादक का जात नाहीत? मोठे मोठे पत्रकार तर कॅबिनेट बैठका कव्हर करायलाही जात नाहीत.

फिल्डवर जाऊन रिपोर्टर्स पण फार प्रगल्भ होतीलच असं नाही. त्यांच्या कडे चिंतन करण्याची क्षमता नसेल तर ते घटनांचा अन्वयार्थ नाही लावू शकत. त्यामुळे ज्यांच्याकडे चिंतन करण्याची क्षमता आहे त्यांनी वस्तुस्थितीला धरून मांडणी केली पाहिजे. कदाचित अशी मांडणी आज लागू पडणारही नाही, ती काळाच्या पुढेही असू शकेल..! पण आज अशी शाश्वत मांडणी करण्याची गरज आहे.

प्रत्येक गोष्टीसाठी 'घटनास्थळी' प्रत्यक्ष गेलंच पाहिजे असं नसतं हेही मान्य, पण अशा बाबींचा अन्वयार्थ लावत असताना सत्यशोधनाची वेगळी व्यवस्था वापरली गेली पाहिजे. सत्यापन करण्यासाठी वेळ घेतला पाहिजे. इंस्टंट रिॲक्ट होण्यामुळे अनेक गोष्टींचं गांभीर्य निघून जातं. रिपोर्टर म्हणून मी अशा खूप चुका केल्यायत, पण अशा चुका विचारवंतांकडून अपेक्षित नाहीत.

गर्दी समोर नतमस्तक होणारी, गर्दीला घाबरणारी अनेक विचारवंत मंडळी व्यक्त व्हायला घाबरतात. मॅक्स महाराष्ट्रच्या सुरूवातीच्या काळात मी अशा अनेक निर्भय विचारवंतांचा 'नकार' पचवलेला आहे. लोकांशी डिस्कनेक्ट असलेल्या, कालातीत विचार न करू शकणाऱ्या विचारवंतांनी थोडं आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं मला वाटतं.

विशेष म्हणजे समविचारी चौकटीतील अनेक विचारवंतांशी मीच कनेक्ट होऊ शकत नाही. मला स्वत:ला त्यांच्याशी बोलताना खूप गॅप जाणवतो. अनेक तज्ज्ञ-विचारवंत पारंपरिक चौकटीत आणि ठोकताळ्यांमध्ये अडकलेले दिसतात. नवीन प्रयोगांचा, नवीन प्रवाहांचा त्यांचा अभ्यास कमी दिसतो.. ! शिकण्याची वृत्ती खुंटलेली दिसते. एकूणच गंभीर प्रकार आहे.

Tags:    

Similar News