विश्लेषण : पक्ष संघटनेचे महत्त्व काँग्रेसला कधी पटणार?

५ राज्यांमधील निवडणुकांमध्ये काँग्रेसची पूर्ण वाताहत झाल्यानंतर आता पक्षश्रेष्ठींनी कारवाईला सुरूवात केली आहे. पण या वरवरच्या कारवाईने काँग्रेसचं पुनरुज्जीवन शक्य आहे का, भाजपच्या यशात मोदींपेक्षाही मोठा वाटा कुणाचा आहे, काँग्रेसही त्याप्रमाणे पुढची पावलं उचलणार का, याचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी...

Update: 2022-03-19 07:37 GMT

पाच राज्यांतील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा असा आदेश पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिला आहे. रायबरेली मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व सोनिया गांधी करतात. तिथेही काँग्रेसचा बाजा वाजला. शेजारच्या अमेठी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व प्रदीर्घकाळ गांधी घराण्याचे वारस करत होते. तिथेही काँग्रेसचा पराभव झाला.

पंजाब राज्याच्या निवडणुकांची जबाबदारी सोनिया गांधींनी उत्तराखंड काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर सोपवली होती. उत्तराखंडातील काँग्रेस उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तब्बल १२ दिवस घेतले.

१९९९ पासून सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. अल्पकाळापुरती ही जबाबदारी राहुल गांधींनी घेतली होती. परंतु पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिल्यावर हंगामी अध्यक्षपदाची सूत्रं पुन्हा सोनिया गांधींच्या हाती सोपवण्यात आली. प्रियंका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०२२ च्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ २ जागा मिळाल्या.

सोनिया, प्रियंका आणि राहुल हे तिघेही काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. यापैकी कोणीही राजीनामे दिलेले नाहीत. तिन्ही गांधींना संघटना मजबूत करता आलेली नाही. मतदारांना आकर्षित करण्यात पूर्णपणे अपयश आलेलं आहे. काँग्रेस पक्षाचा जनाधार ढासळला आहे. भाजपच्या यशामध्ये मोदींचा नाही तर पक्ष संघटनेचा मोठा वाटा आहे. परंतु काँग्रेसजनांना हे मान्य नाही. पक्ष नेतृत्वावर त्यांची अढळ श्रद्धा आहे. भाजपला कंटाळल्यावर मतदारांपुढे काँग्रेसशिवाय अन्य पर्याय नाही अशीही त्यांची धारणा आहे.

काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आणि मतंही दिलं तरिही त्या पक्षाची स्थिती सुधारण्याची फारशी शक्यता नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड यासारख्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष वा अन्य कोणताही पक्ष भक्कम नसल्याने तिथे काँग्रेसला थोडंफार यश मिळू शकतं, एवढंच.

Tags:    

Similar News