Battle of Koregaon-Bhima : ही लढाई बहुजन विरुद्ध अभिजन

बहुजन सैन्य विरुद्ध सरंजामदार अभिजन यांच्यातील ही लढाई होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या जयस्तंभाविषयी कशी माहिती मिळाली ? सांगताहेत किरण सोनावणे

Update: 2026-01-01 06:26 GMT

५०० सैनिकांनी पेशव्याच्या २८००० सैन्याला धूळ चारली ! 

Koregaon-Bhima कोरेगाव भीमा हे Pune पुणे जिल्ह्यातील गाव, तिथून पेरणे या ठिकाणी British ब्रिटिशांनी ५०० सैनिकांनी २८००० पेशव्यांच्या सैनिकाचा पराभव केला. ही लढाई, त्यातील शौर्य इतके अद्भुत होते की, इंग्रजांनी आपल्या या शूर सैनिकांच्या अतुलनीय शौर्याचे कौतुक म्हणून याठिकाणी जय स्तंभ उभारून त्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. हे स्मारक त्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणास्थळ आहे, ज्याला असे वाटते की, माझा शत्रू हा माझ्या पेक्षा प्रचंड ताकदवान आहे. कोरेगाव भीमा येथील लढाई दुसरा बाजीराव पेशवा आणि ब्रिटिश सैन्याच्या विरोधात झाली आणि या लढाई नंतर ब्रिटिशांचे निर्विवाद वर्चस्व स्थापित होऊन पेशवाईचा अंत झाला.

यापूर्वी थोडी पार्श्वभूमी सांगायची म्हणजे ज्या नायनाक महार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या लढाईत शौर्य गाजवले ते ब्रिटिश सैन्यात सामील होण्यापूर्वी ५/६ वर्ष आधी पेशव्याच्याकडे गेले होते आणि त्यांनी आम्हाला आपल्या सैन्यात सामील करून घ्या, आम्ही पराक्रमाची शर्थ करू, मात्र धर्मांध, वर्ण वर्चस्वाचा महारोग झालेल्या सरंजामदार सर्वांनी, आम्ही काय इतके दुबळे आहोत का की, आमच्या सैन्यात महारा मांगाना घेऊ, तुमची हिंमतच कशी झाली आमची बरोबरी करण्याची, इथून ताबडतोब चालते व्हा. हा अपमान नायनाक महार आणि त्याच्या सहकाऱ्यांना जिव्हारी बसला आणि त्यांनी थेट ब्रिटिश सैन्यात प्रवेश मिळवला. इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा संवादातील ते वाक्य आठवते ज्यात बाबासाहेब या पेशवाई प्रवृत्तीच्या अनुषंगाने बोलतात ",Mr Gandhi, I don't have motherland"

हे युद्ध बहुजन सैन्य विरुद्ध सरंजामदार अभिजन यांच्यातील ही लढाई होती कारण ब्रिटिशांनी दलित समाजातील, गरीब मराठा, कुणबी, मुस्लिम, गरीब पंजाबी लोकांना आपल्या सैन्यात भरती केले होते, ब्रिटिशांनी दलित जातींना सैन्य आणि शिक्षण याची दारे उघडी केली त्यामुळे आपल्याला क्रांतीचा बाप महात्मा फुले, सावित्रीमाई फुले मिळाले आणि त्याचा वारसा चालवणारे बाबासाहेब आंबेडकर मिळाले. ब्रिटिश हे आक्रमणकरी, देश लुटायला आलेले होते यात शंका नाही, मात्र दलितांचे, बहुजनांचे प्रथम क्रमांकाचे शत्रू इथली वर्ण व्यवस्था आणि त्याबरोबर हुकूमसत्ता चालवणारे राज्यकर्ते होते.

इंग्रजांनी या जयस्तंभाची देखभाल करण्याची जबाबदारी या लढाईत सहभागी झालेले हवालदार माळवदकर यांच्या कुटुंबावर सोपवली यासाठी ब्रिटिशांनी त्यांना २६७ एकर जमीन दिली आणि आता जिथे जयस्तंभ आहे ती जागा फक्त जयस्तंभाची आहे. त्याचा वाद न्यायालयात आमचे मित्र दादाभाऊ अभंग गेली अनेक वर्ष लढत आहेत. दोन कोर्टात ते लढाई जिंकले, मात्र आता त्यात राजकारण शिरल्याने, पुणे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी तारखेलाच येत नाही, पुन्हा इथे सरंजामदार मराठे प्रकरणात अडचणी निर्माण करीत आहे.

मात्र बाबासाहेब आंबेडकर यांना या जयस्तंभ संदर्भात माहिती त्यांचे वडील रामजी सुभेदार यांनी दिली कारण ते स्वतः सैन्यात होते आणि गोपाळबाबा वलंगकर यांनी दिली. गोपाळबाबा हे प्रचंड क्रांतिकारी व्यक्तिमत्व होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणातून या जयस्तंभाचा आणि लढाईचा उल्लेख आपल्या पददलित कार्यकर्त्यांच्या मध्ये शौर्य, स्वाभिमान आणि अस्मिता पेरण्यासाठी करत असत, बाबासाहेब १ जानेवारीला या जयस्तंभाला त्यांना वेळ असेल तेव्हा भेट देत, मात्र इतर वेळी देखील ते त्या मार्गाने गेले तर इथे थांबत असत.

कोरेगाव भीमाची लढाई ही युद्ध शास्त्राच्या जगातील सात लढाया च्या पैकी एक लढाई मानली जाते ही लढाई युद्धशास्त्रात शिकवली जाते इतकी महत्वपूर्ण ही लढाई आहे.

त्यामुळे नव्या वर्षाचा पहिला शौर्याचा उत्सव म्हणून लाखो बहुजन समाजातील व्यक्ती इथे अभिवादन करण्यासाठी जातात आणि स्वतः धडा घेऊन येतात की, शत्रू कितीही मोठा असला, जर आपल्यात जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर जीवनातील कितीही मोठ्या शत्रूला पराभूत करता येते. त्याच प्रमाणे हा दिवस शौर्य आणि ज्ञान घेऊन येणारा असा १ जानेवारी दिवस आहे. १८१८, रोजी झालेल्या लढाईने दलितांना क्षत्रियत्व प्रदान केले तर १ जानेवारी १८४८ रोजी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी देखील पेशवाईच्या विरोधात ज्ञानाची लढाई आरंभ केली, मुलींच्या साठी पहिली शाळा यादिवशी सुरू झाली, धार्मिक दृष्ट्या अतिशय पददलित समजलेल्या स्त्रियांच्या जीवनात ज्ञानाचा पहिला सूर्योदय याच दिवशी झाला. त्यामुळे १ जानेवारी हा देशातील सर्व त्या लोकांचा उत्सव आहेत जे विषमता आणि शोषणाच्या विरोधात लढाई करत आहे.

तुम्ही मी आणि आपण सर्व जिथे कुठे असू तिथे या शौर्य आणि ज्ञानाचा वसा जपत राहू. तुम्हाला खूप खूप प्रेरणादायी शुभेच्छा

किरण सोनावणे

९९२२६६६६०७

Similar News