Savitribai Phule Jayanti : "सावित्री उत्सव" महाराष्ट्रातचं नाही तर संपूर्ण देशभर साजरा व्हावा- उर्मिला मातोंडकर

ज्या समाजात स्त्रीकडे दास्यत्वाच्या नजरेतून पाहिलं जायचं त्याकाळात सावित्रीबाई फुले यांनी शेण, दगडं अंगावर झेलतं सर्व धर्मातील स्त्रियांना शिक्षण देण्याची सुरुवात केली. स्त्री शिक्षणाची ज्योत त्या काळात सुरु करणं हे धैर्याचं होतं. सावित्रीबाई फुले यांचे कार्य, योगदान, विचार सध्याच्या काळात कसे पुढे नेता येतील ? यासंदर्भात बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा लेख नक्की वाचा..

Update: 2026-01-02 20:21 GMT

Savitribai Phule Jayanti 2026 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रात दरवर्षी सावित्री उत्सव साजरा केला जातो. खरं तर तो संपूर्ण देशभरात साजरा केला गेला पाहिजे. कारण की, सावित्रीबाई फुले जर नसत्या आणि त्यांनी स्त्री शिक्षणाचे जे कार्य केलंय. ते कार्य त्यांच्या काळात झालं नसतं तर आज या देशातील स्त्रियांची परिस्थिती काय असती? हा विचारही अतिशय भयावह आहे. कारण का आजही जेव्हा स्त्रियांच्याबाबतीत आपण पाहतो, त्यांना मिळणारी नोकरीची संधी असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जिथे अजूनही त्यांना प्रवेश नाही. अगदी जर एखादी संधी मिळालीच तर महिलांकडे बघताना लोकांच्या भुवया आपोआप उंचावल्या जातात ही वस्तुस्थिती आहे. परंतु आजपर्यंतचा स्त्रियांनी केलेला प्रगतीचा प्रवासही खूप मोठा आहे. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात आणि सामाजिक दृष्टीने आपल्या स्वकर्तृत्वावर घेतलेली स्त्रियांची उंच भरारी असो... मुळातच याचा पहिला पाया सावित्रीबाई फुले यांनी रोवला तो म्हणजे स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. 

आपण कितीही मोठा विचार करण्याचा प्रयत्न केला तरी, पूर्वीच्या काळातील एका स्त्रीने आधी घराबाहेर पडणं आणि तेही शिक्षणाच्या कारणाने घराबाहेर पडणं चुकीचं मानलं जात होतं, तरीही एवढ्या सगळ्यातून शेणा-दगडाचा मारा झेलत सावित्रीबाई फुले यांनी विरोधाचा निर्भीडपणे सामना केला जेणे करून महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला, स्त्री ला शिक्षण मिळावं. काय असेल तेव्हाची परिस्थिती विचारही करणंंही कठीण आहे. 

आजसुद्धा मी एक कर्तृत्वान, यशस्वी स्त्री आहे तरी देखील मला माझ्या माझ्या अवती-भवती असं दिसतं की, माझ्या क्षेत्रात असो किंवा इतर क्षेत्रात महिलांना अजूनही खूप प्रगती करायची आहे. मुळातच ३ जानेवारीला सावित्री उत्सव आपण साजरा करतो. आपण सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची, योगदानाची दखल घेऊन त्यांना अपरिमित कृतज्ञता व्यक्त करतच असतो आणि येणाऱ्या पिढीला देखील या माध्यमातून आवाहन करत असतो की, हा आतापर्यंतचा शिक्षणाचा झालेला प्रवास आपल्या सर्वांना मिळून अजूनही खूप पुढे घेऊन जायचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, हा नवीन वर्षातला पहिला उत्सव संपूर्ण देशभर साजरा झाला पाहिजे. 

अग्रगण्य महाराष्ट्र... बुद्धीमान लोकांचा महाराष्ट्र याच्यातला 'महा' मला नेहमीच महान लोकांचा आहे असं वाटतं. कारण देशाला दिशा देणारं राष्ट्र म्हणून मला त्याच्यातला महा हा महान लोकांचा आहे असं वाटतं. आणि या महाराष्ट्रात सर्वात अग्रगण्य सावित्रीबाई फुले आहेत. जिथे स्त्रियांचा प्रश्न येतो, जिथे स्त्री शिक्षणाचा प्रश्न येतो. त्यामुळे आपण यावर कितीही बोलू, लिहू तेवढ कमीच आहे. त्याची अपरिमित कृतज्ञता मनामध्ये ठेवून ती ज्योत खरंतर आपल्या मनामध्ये नेहमी राहिली पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांच्या मनात ती तेवत राहिलं अशी मी या विशेष दिवशी आशा व्यक्त करते. तसेच यानिमित्ताने मॅक्स महाराष्ट्रचेही खूप धन्यवाद. ते दरवर्षी सावित्री उत्सवात जे काही शक्य आहे त्यांच्या दृष्टीने ते करत असतात म्हणून त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद. 

उर्मिला मातोंडकर

अभिनेत्री



  

Similar News